पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/125

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अलबेल करणेही दिसून येते. पण दक्षता, सेवाभाव व निरंतर निरीक्षण, निर्णय, उपचारबदल यातून बालकांचे आयुष्यवर्धन व सुदृढीकरण होत असते हे लक्षात घेऊन उपचारपद्धतीत मानवी हस्तक्षेप व गुंतवणूक जितकी वाढेल तितके मुलांचे रोगग्रस्त होणे कमी होईल.. त्वरित उपचार उपलब्धतेचा ग्रामीण व आदिवासी भागातील प्रश्न महत्त्वाचा आहे. त्या आघाडीवर लक्ष केंद्रित करायला हवे. प्रतिबंधात्मक उपाय आहार, उपचार आधुनिकता, विकसित तंत्रज्ञान वापर, सेवापरायणता अशा अनेकविध उपायांच्या सुनियोजित अंमलबजावणीने उपचारासंबंधी मुलांचे प्रश्न सोडविण्याची यंत्रणा कार्यरत होणे आवश्यक आहे.
शिक्षण
 मुलांचे शिक्षण हा समाजाच्या चिंतेचा विषय झाला आहे. केवळ महाग होत जाणाच्या शिक्षणाचा धसका घेऊन मुलांच्या जन्माबाबत मुलगा होऊ दे की मुलगी - पण ‘एक पुरे' अशी मानसिकता वाढते आहे. एकुलत्या एकास/ एकीस सकस आहार, आरोग्य, उपचार, शिक्षण देण्याकडे समाजाचा वाढता कल हे मुलांविषयीच्या जागृतीचे लक्षण असले तरी एकच अपत्य असण्याचे सामाजिक दुष्परिणाम घरोघरी दिसत आहेत. अति लाड, केंद्रितता, मागेल ते देणं यामुळे मुलं हट्टी व आक्रमक होत आहेत. अशा मुलांच्या वर्तनाचे नित्य नवे प्रश्न शाळांना भेडसावताना दिसतात. शिक्षणात बालकेंद्रित सुधारणा होत आहेत. पुस्तकांचे ओझे कमी करणे, परीक्षेचा ताण नष्ट करणे, जीवनोपयोगी शिक्षण देणे, ते आनंददायी, निर्मितीक्षम व प्रयोगी करणे यातून शिक्षणाचा दर्जा उंचावत आहे. शिक्षकांची शैक्षणिक पात्रता वाढते आहे. वेतनमान व सुविधाही वाढत आहे. पण डॉक्टरी व्यवसायाप्रमाणे शिक्षणाचेही गतीने अधःपतन होते आहे. मूल्य व सेवावृत्तीची घसरण यामुळे शिक्षणात अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या व्यक्तिगत लक्ष व व्यक्तिगत विकास या दोन बाबींची वानवा दिसते. विकास केवळ भौतिक स्तरावर होत असल्याने भपका वाढला, भावनिकता कमी झाली.

 साधनसंपन्नता आवश्यकच पण साध्यपूर्ती त्यापेक्षा अधिक महत्त्वाची. मूल केंद्र मानून कार्यनियोजन आवश्यक. त्यासाठी वर्गातील मुलांची संख्या कमी करणे, शिक्षक संख्या वाढवणे, शाळेत समुपदेशक, आहारतज्ज्ञ, विविध उपचार करणारे मानसेवी तज्ज्ञ नेमणे या गोष्टींवर भर देणे गरजेचे आहे. सतत अभ्यासक्रमविषयक धोरण बदलणे, बदलामागील राजकीय प्रेरणा प्रबल होणे (उदा. एनसीआरटीचे व्यंग प्रधान राज्यशास्त्राचे पुस्तक चर्चेविना रद्द करणे) यातून सैद्धान्तिक पाया ढासळून विसंगती निर्माण होत

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/१२४