पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/124

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जन्म देत आहेत. वाढतं प्रदूषण, मुलांना फॅशन किंवा पॅशन म्हणून बाइक, स्कूटरवरून फिरवणं यात कार्बन शरीरात साठून आपण पिढी गुदमरून टाकतो. मुलांना शाळेला जाताना ऑक्सिजनची नळकांडी पाठीवर घेऊन फिरायला लागेल असं भाकीत वा भविष्य सांगणारं एक पोस्टर मी एका आरटीओ ऑफिसमध्ये पाहिलं तेव्हा नि रहदारीच्या रस्त्यांवर प्रदूषण निर्देशांक दर्शविणारी घड्याळं पाहिली तेव्हाही माझा चुकलेला ठोका पालकांच्या अजून कसा लक्षात येत नाही? याचं आश्चर्य वाटतं. औषधांपेक्षा आहारावर, उपचारापेक्षा प्रतिबंधावर जोवर आपण लक्ष केंद्रित करणार नाही, तोवर मुलांचे आरोग्याचे रोज वाढणारे प्रश्न कमी होणार नाहीत. ‘शुभंकरोती कल्याणम, आरोग्य धनसंपदा'चा श्लोक घरोघरी आचारधर्म होईल तो सुदिन. प्रत्येक गल्लीतली डॉक्टर, दवाखान्याची पाटी आपल्या अनारोग्याची साक्ष आहे, हे लक्षात घेऊन डॉक्टरांकडे जावे लागू नये अशी जीवनशैली पालकांनी पाल्यांसाठी ताबडतोब आत्मसात करायला हवी.
उपचार
 ‘रोगापेक्षा इलाज भयंकर' अशी आपल्याकडे लोकोक्ती प्रचलित आहे. तिची पुरेपूर प्रचिती एकविसाव्या शतकातील नित्य महाग होत चाललेल्या उपचारांमुळे येत आहे. त्यामुळे मुलांना जगवावे कसे असा भीषण प्रश्न पालकांपुढे आहे. गेल्या काही वर्षांत अनेक कारणांनी बालमृत्यूप्रमाण कमी करण्याचे उपाय करूनही ते वाढतेच आहे. जीवनसंजीवक औषधे (Life Saving Drug) महाग होत आहेत. ती दिवसेंदिवस प्रतिक्रियात्मक होत असल्याने त्याचे प्रतिक्रियात्मक दुष्परिणाम (Side Effects) दिसून येत आहेत. जीवनसंरक्षक नि वर्धक उपचार साधने व तंत्र विकसित झाले आहे. ते प्रामुख्याने खासगी रुग्णालयात असल्याने त्याची भरमसाठ फी देणे दिवसेंदिवस पालकांच्या आवाक्याबाहेर जात आहे. शासकीय रुग्णालयात उपचार घेणारे गरीब पालक तेथील सुमार उपचार व साधनांमुळे हैराण आहेत. गर्भवती मातांचे गर्भनिरोधक उपचार (औषधे) इ. मुळेही नवजात अर्भकांवर विपरीत परिणाम होताना आढळतात.

 उपचारांबरोबरच वैद्यकीय सेवेतील समर्पण, सेवाभाव कमी होऊन त्यात गल्लाभरू व्यावसायिकता वाढत आहे. निदान अचूक होण्यासाठी डॉक्टर, नर्सेस यांचे जे एकाग्र लक्ष अपेक्षित असते त्याची जागा आय.सी.यू., मॉनिटरिंग मशिन्सनी घेतली असल्याने मुलांना कोवळ्या वयात लागणारा मायेचा ओलावा, दिलासा, स्पर्श, उबारा, प्रेम इ. गोष्टींच्या अभावामुळे उपचारात यांत्रिकता वाढते आहे. ग्राहक संरक्षण कायद्यामुळे कागदोपत्री

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/१२३