पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/115

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वाढते आहे. हुंडा, न पटणे, अपत्यहीनता व वांझपण इ. प्रमुख कारणांमुळे घटस्फोट होतात. पुरुषांकडून स्त्रीस घटस्फोट देण्याचे येथील प्रमाण जुनेच आहे. विशिष्ट धर्मातून हे प्रमाण धर्ममार्तंडांच्या पारंपरिक दृष्टीमुळे आहे तसे आहे. काळाप्रमाणे यात घट होणे म्हणजे समाज विकसित होणे होय. घटस्फोटाबरोबरच विधवा स्त्रियांचे वाढते प्रमाण सामाजिक चिंतेचा विषय बनतो आहे. अल्पवयात विवाह व वयोमर्यादा वाढ यातूनही हे प्रमाण वाढताना दिसते. घटस्फोटित पुरुषांचे विवाह पुरुषसत्ताक समाजधारणेमुळे शक्य होतात. पण घटस्फोटित वा विधवा स्त्रियांचे विवाह आजही भारतात संथ गतीनेच होताना दिसतात. त्याचे दुष्परिणाम येथील भगिनीवर्गास भोगावे लागणे यातून स्त्री-पुरुष समानतेचा माणूस प्रवास अजून किती दशके करावा लागेल हे सांगता येणे अशक्य असले तरी भारतीय समाजातील स्त्रीविषयक भावसाक्षरता नक्कीच आश्वासक आहे.
स्त्रियांची कुटुंबातील आर्थिक भागीदरी
 भारतातील स्त्रियांच्या शिक्षण व सक्षमीकरणाचे प्रतिबिंब मोठ्या प्रमाणात नोकरी व व्यवसायातील त्यांची उपस्थिती व भागीदारी यातून दिसून येते. कुटुंबात कमावती स्त्री असणे म्हणजे त्या घराचे राहणीमान उंचावणे होय. मिळवती स्त्री प्रथम पत्नीच्या रूपात व आता दुस-या टप्प्यात मुलींच्या रूपात दिसू लागली आहे. शहर व ग्रामीण परिसरात स्त्रीचं शिकणं, मिळवणं यात आता काही गैर वाटत नाही. शिक्षित व मिळवत्या मुलीची प्रथम पसंती यातून ते स्पष्ट होतं. यामुळे समाजाच्या सर्व थरात मिळवत्या स्त्रीमुळे घरच्या गरजा विनासायास भागवणे शक्य होते. स्त्रियांच्या कुटुंबातील आर्थिक भागिदारीमुळे विचार-विनिमय, निर्णय यात तिला स्थान मिळून ती पुरुषाची बरोबरी करू लागली आहे. मुलांच्या शिक्षण, वाढ, विकासात स्त्री-पुरुष समान भागिदारी यामुळे शक्य झाली आहे.
स्थलांतर

 जागतिकीकरणातून भारतीय नवशिक्षित युवकवर्ग मोठ्या प्रमाणात विदेशात जाताना दिसतो. हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्थलांतर होय. पण देशांतर्गत ही स्थलांतराची गती जागतिकीकरणामुळे वाढली आहे. श्रमजीवी कुटुंबे रस्ते विकास, इमारत बांधकाम, खनन उद्योग, विविध व्यवसाय इ.मुळे खेड्यातून जिल्ह्याच्या ठिकाणी, जिल्ह्यातून राजधानीच्या ठिकाणी शिवाय राज्यांतर करूनही कुटुंबेच्या कुटुंबे स्थलांतरित होत आहेत. प्रथम शिक्षणासाठी व नंतर नोकरी, व्यवसायासाठी म्हणून नवशिक्षित युवक-युवती मोठ्या प्रमाणात नगरातून महानगरांकडे स्थलांतरित होताना दिसतात. मुंबई, पुणे,

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/११४