पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/113

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

भव' चा आशीर्वाद इतिहासजमा झाला. गरीब, श्रीमंत, शिक्षित-अशिक्षित, अल्पसंख्य, मागासवर्गीय एवढेच काय आदिवासी बहल क्षेत्रातही जननप्रमाण घटले. सन १९८० साली ‘हम दो हमारे दो'चा जमाना होता. सन १९९० नंतर ‘हम दो हमारा एक’, ‘बच्ची हो या बच्चा, हमारा एकही जच्चा' इथवर झालेल्या प्रबोधनाने एकविसाव्या शतकात ‘दुहेरी उत्पन्न, जनन व्युत्पन्न'ची घोषणा सार्थ केली. डिंक फॅमिली (Double Income, No Kids) चा मेट्रो सिटीजमधील नवा फंडा समाजस्वास्थ्यासाठी भविष्यात यक्षप्रश्न बनवणारा असला तरी ‘उद्याचं उद्या बघूच्या भारतीय मनोवृत्तीमुळे आजतरी नवदांपत्यात आकर्षण ठरत आहे. विवाहाचं रूपांतर 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये होणं हेही त्याचं एक प्रमुख कारण होय!
विवाहाचे वाढते वय नि प्रौढकाली अपत्यधारणा
 बालविवाह प्रथेपोटी स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात संमती वयाचा कायदा करावा लागला होता. बालविवाह प्रतिबंधक कायद्यामुळे सज्ञान वयी विवाह भारतात रूढ झाले तरी अल्पवयीन विवाहाची प्रथा आजही भारतातील ग्रामीण, आदिवासी भागात, अप्रगत राज्यातून दिसून येते, परंतु जागतिकीकरणाचा परिणाम म्हणून उच्च शिक्षण घेणे आवश्यक बनत गेले. कधीकाळी 'नॉन मॅट्रिक’ ‘व्हर्नाक्युलर फायनल' (सातवी पास) ही समाज शिक्षणाची असलेली सरासरी... जागतिकीकरणात त्याची जागा पदवीने घेतली. साधा शिपाई पण संगणक साक्षर, पदवीधर असावा असे वाटण्याचे आजचे दिवस. यामुळे शिक्षणमान वाढत गेले. परिणामी विवाहाचे सरासरी वयही वाढते आहे. १८ वर्ष पूर्ण मुलीसाठी तर २१ वर्षे पूर्ण मुलासाठी असलेले विवाहवय... नागरी क्षेत्रात ते क्रमशः २८....३० झाले आहे. विवाहाच्या वाढत्या वयामुळे उशिरा मुले होणे ओघाने आलेच. घर, नोकरी, गाडी आधी, विवाह, अपत्य नंतर; असा नवा प्रघात रूढ होत आहे. प्रौढ वयातील अपत्यधारणेचा परिणाम अपत्य संख्येवर होतो आहे. सध्या एका अपत्यावर कुटुंबनियोजन होते आहे.
मृत्यू प्रमाणातील घट व वयोवर्धन

 बाल नि वृद्धांच्या मृत्यू प्रमाणातील सातत्यपूर्ण घटीमुळे भारत २०२० पर्यंत जगातील कार्यक्षम तरुणांची संख्या असलेला देश बनतो आहे. आरोग्य सुविधांचा विकास, शिक्षणप्रसार, जीवनवर्धक उपचार सुविधा, निवृत्ती व उपादान योजना, भविष्य निर्वाह निधी इ. अनेक कारणांनी बालमृत्यू व वृद्ध मृत्यूचे प्रमाण घटते आहे. परिणामी भारतीयांचे सरासरी वयोमान वाढते आहे. बालमृत्यू प्रमाणात घट, अपत्य संख्या नियंत्रण, वृद्धांचे निरंतर वयोवर्धन

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/११२