पान:एकविसाव्या शतकातील शिक्षण (Eakavisavya shatakatil shikshan).pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वेगवेगळ्या प्रकारे सहभागी करून घेताना मी इंग्लंडमधील वास्तव्यात अनुभवले. एका शाळेची सहल तेथील एका वस्तुसंग्रहालयाला जायची होती, तर ते शिक्षक आठ दिवस त्या वस्तुसंग्रहालयाचा पूर्ण अभ्यास करतात. मग मुलांना माहिती देतात. मुलांच्या संभाव्य शंका-कुशंकांची शिक्षकांनी केलेली यादी, प्रश्नोत्तरांची तयारी पाहून तर माझ्यातील शिक्षकाला आपल्या नाकर्तेपणाची शरम वाटल्यावाचून राहिली नाही. सहलीपूर्वी पालकांनाही प्रशिक्षित केले जातं. दीर्घ पल्ल्याची सहल असेल तर पालकांकडून शाळा वेगवेगळ्या तारखांची पत्रे आगाऊ लिहून घेतात. वेगवेगळ्या मुक्कामांत ती मुलांना पोस्टाने मिळतील याची दक्षता घेतात. दीर्घकाळ घराला पारखी होणारी मुलं आई-वडिलांच्या आठवणीने आजारी पडू नयेत. Home sick होऊ नयेत म्हणून घेतलेली ही काळजी आपणास निश्चितच अंतर्मुख करील. अशीच पत्रे विद्यार्थ्यांकडून पालकांना पाठविण्याचीही व्यवस्था करण्यात येते. सहलीचा सर्व कार्यक्रम, मुक्कामाचं ठिकाण, तेथील दूरध्वनी क्रमांक इत्यादींची सर्व माहिती शिक्षक पालकांना देत असतात. दररोजच्या अध्यापनासाठीची आवश्यक ती पूर्वतयारी शिक्षक कोणाचेही पर्यवेक्षण नसताना करीत असतो हे विशेष. महाविद्यालयीन शिक्षक तर आपल्या घरच्या टंकलेखन यंत्रावर वर्गातील दहा-बारा विद्याथ्र्यांना द्यावयाच्या टिपांच्या प्रतीही तयार करीत असतो. कमी वेळात विद्याथ्र्याला अधिक कसे देता येईल, यासाठी शिक्षकांची कोण धडपड असते! तेथे स्वलेखनापेक्षा वरच्या वर्गात टंकलेखनावर भर असतो. 'मुलांनो उद्या येताना हा गृहपाठ लिहून आणा' असं सांगायची तिथे सोय राहिली नाही. मुले तुम्हास "Sir, we can't write, we can only type write." म्हणून उत्तर देती झाली तर आश्चर्य वाटायला नको.
 तेथील दूरदर्शनने शैक्षणिक चॅनल्स सुरू करून शिक्षक व्यवसायाची आवश्यकताच मोडीत काढली आहे. मोठ्या प्रमाणात निघणा-या व्हीडिओ कॅसेटस्मुळे घरच शाळा बनू पाहत आहे. अलीकडेच युरोपात आलेल्या 'मिनी टेल' या संगणकीय दूरध्वनी व्यवस्थेमुळे मुले आपल्या घरातून शिक्षकांशी संवाद साधतात. टेलिफोनला जोडलेल्या स्क्रीनवर शिक्षक आपणाला हवे ते स्पष्टीकरण मुलांना देतात. मुलांनी शंका-कुशंकांचा भडिमार केला तरी शिक्षक अत्यंत संयमाने 'मिनी टेल'द्वारे संवाद करताना मी अनुभवले आहे. तिथे या सोईमुळे शिक्षक २४ तास विद्यार्थ्यांच्या दिमतीला असतो.

 युरोपातील बहुधा सर्व देशांत शिक्षण ही राज्यांची जबाबदारी मानण्यात आली आहे. युरोपातील राष्ट्रे आपल्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या ७ ते १० टक्के

एकविसाव्या शतकातील शिक्षण/९२