पान:एकविसाव्या शतकातील शिक्षण (Eakavisavya shatakatil shikshan).pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



असून तिथे सर्व वयोगट, व्यवसायातील लोक आपल्या आवडीनिवडीप्रमाणे सतत शिकत राहून स्वतःच्या ज्ञानात भर घालत असतात.
 युरोपात सर्वत्र विद्यार्थी-शिक्षक प्रमाण २०:१ असे स्वीकारण्यात आले आहे. तिथे एखाद्या शाळेने एखाद्या वर्गात २० पेक्षा अधिक मुलांना प्रवेश दिला तर पालक संघ शाळेपुढे निदर्शने करून आपल्या पाल्याच्या गुणवत्तेवर परिणाम होणार नाही, व्यक्तिगत दुर्लक्ष होणार नाही, याची शाळेकडून हमी घेतात. अशा एका शाळेत मला आपल्याकडील वर्गातील मान्य विद्यार्थिसंख्या ६० ते ८० आहे, हे सांगितल्यावरून त्यांनी आश्चर्याने डोळे विस्फारले. मी त्यांना आपण सामूहिक शिक्षणाचे (Mass Education) हे तत्व तेथील आर्थिक साधनांच्या कमतरतेमुळे नाईलाजाने अंगिकारल्याचं सांगितल्यानंतर ऐकणारी शिक्षिका म्हणाली "You are not promoting mass education but a mob education." १५०-२०० मुलांच्या वर्गांना शिकविणा-या माझ्यासारख्या महाविद्यालयीन शिक्षकास तिच्या विधानातील कटूसत्य कळण्यास क्षणाचाही विलंब लागला नाही.

 तेथील शिक्षणात घोकंपट्टीपेक्षा स्वाध्यायी शिक्षणावर भर देण्यात आला आहे. मुले स्वतंत्रपणे वाढत असल्याने तेथील आई-वडील, पालक आपल्यासारखे मुलांच्या अभ्यासाच्या काळजीने रक्तदाब वाढवून घेताना दिसत नाही. तेथील समाजजीवन स्वयंशिस्तीवर उभारलं असल्याने स्वाध्याय' व 'स्वाश्रय' हा तेथील शिक्षणाचा मूलमंत्र म्हणावा लागेल. युरोपातील इटली, पूर्व जर्मनी या देशांचा अपवाद वगळता मला सर्वत्र शैक्षणिक संस्था भौतिक व शैक्षणिक साधन-सुविधांनी संपन्न आढळल्या. सर्व शाळांत आवश्यक वर्ग, त्यांची आकर्षक मांडणी, सजावट, वर्गास जोडून स्वच्छ नि सुगंधी प्रसाधनगृह, भव्य क्रीडांगण, जिम्नॅशियम, आर्ट गॅलरी, मनोरंजनगृह, अभ्यासिका, ग्रंथालय, वाचनकक्ष, दृक्श्राव्य केंद्र, अभ्यागत कक्ष, शिक्षकालय या सोई आढळून आल्या. तेथील शिक्षक विद्यार्थ्यांसाठी घेत असलेली मेहनत पाहून आपल्या शिक्षकांना करण्यास भरपूर वाव असल्याची जाणीव झाली. युरोपातील शिक्षक व्यासंगी असतात. शिवाय तेथील शिक्षण विभाग चालवित असलेल्या सेवांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम, निरंतर शिक्षण, विस्तारकार्य यांत त्याला सतत सहभाग घ्यावा लागतो. शिक्षकाच्या ‘शिक्षकी व्यक्तिमत्त्वाचे वारंवार केले जाणारे मूल्यमापन आपण लक्षात घेण्यासारखं नि अनुकरणीय वाटलं. साधा सहलीसारखा भाग घेतला तरी शिक्षक त्याचे वर्षभर नियोजन करताना दिसून आले. तिथे सहलीच्या पूर्वतयारीत शिक्षक भरपूर राबतात. या तयारीत ते पालकांनाही

एकविसाव्या शतकातील शिक्षण/९१