पान:एकविसाव्या शतकातील शिक्षण (Eakavisavya shatakatil shikshan).pdf/9

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 जगात शिक्षण क्षेत्रात काय बदल होत आहेत, तंत्रज्ञान व माहितीच्या क्षेत्रात काय क्रांती घडते आहे, ज्ञानाधिष्ठित समाजनिर्मिती व संघटनाच्या क्षेत्रात संगणक, इंटरनेट, त्रिमिती क्रांती (Light, Sound and Vision Revolution), आभासी व महाजालीय शिक्षण प्रणाली (Virtual and Online Education System) मुळे मौखिक शिक्षणाची क्षितिजे धूसर होत आहेत, याचे भान व स्वीकार छोटे-छोटे देश ज्या गतीने आत्मसात करतात, ते पाहता या क्षेत्रात अजून आपण रांगतोच आहोत याची जाणीव झाली असली तरी बदलाची गती धिमी आहे. प्रश्न पैशाचा नसून दृष्टीचा आहे शिक्षकांनी शासन, व्यवस्थेची वाट न पाहता आपल्या शिक्षकी व्यक्तिमत्त्वाचा विकास व व्यावसायिक गरज म्हणून संगणक-साक्षर व संगणक कुशल (Computer Savy) व्हायला हवे. विद्यार्थ्यांची नवी पिढी साक्षर व शिक्षक निरक्षर अशी नामुष्की टाळण्यासाठी तरी संगणक-कुशलतेस पर्याय नाही.
 गेल्या ३५ वर्षांच्या अध्ययन, अध्यापन, संशोधन, लेखन, प्रकाशन, संवाद इत्यादी क्षेत्रांत कार्य करीत असताना मला शिक्षणाविषयी जे वाटले ते या पुस्तकातील लेखांत वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. वरील विचार त्याचाच एक भाग होय. मला शिक्षण क्षेत्राविषयीची कावीळ झाली आहे, असे वाचकांना प्रथमदर्शनी वाटेल; पण मी नकारात्मक विचार करणारा शिक्षक नाही. व्यवस्थेविषयी मी नाराज असलो तरी निराश नाही. या सर्व विषम परिस्थितीत शिक्षक हा माझ्यासाठी शेवटचा आशाकिरण आहे. सर्वच साकळलेले नाही, झाकोळलेले नाही. बदलाची धुकधुकी मी शिक्षक प्रशिक्षण, शिक्षक सहविचार सभांतून अनुभवतो आहे. सहाव्या वेतन आयोगाने शिक्षकांना आर्थिक समृद्धी दिली, स्थैर्य दिले. आता गरज आहे स्वप्रज्ञ विकासाच्या ठिणगीची -

एक चिनगारी कहीं से हूँढ लाओ दोस्तों,
इस दिये में तेल से भिगी बाती तो है।

 असं हिंदी कवी दुष्यंतकुमारांनी म्हटले होते. त्याची या क्षणी आठवण होते. हे लेख व त्यांतील विचार वाचीत असताना मी राळ ओकतो आहे, असंही क्षणभर तुम्हाला वाटेल; पण परत दुष्यंतकुमारांच्याच ओळींत सांगू इच्छितो -

सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नहीं
मेरी कोशिश है कि सूरत बदलनी चाहिए।

- डॉ. सुनीलकुमार लवटे