पान:एकविसाव्या शतकातील शिक्षण (Eakavisavya shatakatil shikshan).pdf/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

व नियोजनबद्ध पद्धतीने. म्हणजे त्याला स्वतंत्र खोली, सुविधा देण्याची शक्यता अजमावून. शिवाय पाच वर्षे त्याच्या वाढी-विकासाचे नियोजन करून. या काळात आई-वडील आळीपाळीने मुलास वेळ देतात. शिवाय मूल जन्मले की ते स्वतंत्रपणे वाढेल याची काळजी घेतली जाते. पहिल्या दिवसापासून त्याला स्वतंत्र झोपवले जाते. आपल्याकडे कुशीत, कडेवर सतत बाळ ठेवण्यातून जो पाश तयार (Attachment) होतो तो तोडणं मग अवघड होतं. याचा अर्थ मुलांना अनाथ करणं होत नाही. मधल्या काळात व्यक्तिस्वातंत्र्याच्या अतिरेकातून घरे तुटली. 'हम दो, हमारे दो'चा काळ संपला. आता ‘ओन्ली वन'चा काळ आला; पण मुले ‘लोन्ली' झाली, ती आजी-आजोबा घरी नसल्याने! स्त्रीविकास म्हणजे जबाबदारी-मुक्त स्वैराचार नव्हे, याचं तारतम्य ठेवले तरी सुवर्णमध्य गाठता येणं शक्य आहे. हे मी माझ्या घरच्या उदाहरणांवरून सांगू शकतो.

 एकविसाव्या शतकाचे पहिले दशक संपले. आज स्त्रीशिक्षण व विकासाचे जे स्थूल चित्र समोर येते, ते पाहणे भविष्यकालीन मार्गनिश्चितीस उपयोगी पडेल असे वाटते. सध्या आपण जन्मप्रमाणावर नियंत्रण करण्याच्या आघाडीवर यशस्वी झालो आहोत. एक, दोन, तीनच्या पलीकडे अपत्य सहसा दिसत नाही. महानगरांतून (मुंबई, बंगलोर, हैदराबाद, दिल्ली इत्यादी) लग्नाशिवाय एकत्र राहण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. (Live in Relationship) कुटुंब नियोजन साधनांच्या वापराची जागृती खेड्यांतही पाहावयास मिळते. स्त्रियांमध्येही दिसून येते हे महत्त्वाचे. शहरांमधून नवविवाहित दाम्पत्यात ‘एक चूल, एक मूल’ सर्वत्र आढळू लागले आहे. प्रौढ आई-वडील (आजी-आजोबा) मुले, मुली स्वतंत्र झाल्यावर (नोकरी, लग्न इत्यादींनी) स्वतंत्र राहण्याचे प्रमाण वाढले आहे. या सर्वांचा मानसिक ताण, एकटेपण नवजात पिढी भोगते आहे. त्याचे गंभीर परिणाम लवकरच दिसू लागतील. मुले हट्टी होणे, अभ्यास न करणे, मोठी होऊन वाममार्गी लागणे, बाहेरख्याली वागणे (मुलांचं तसंच मुलींचेही!) यातून पालकांची बेजबाबदारीच स्पष्ट होईल. भारतातील नोकरदार वर्ग हा नवश्रीमंत उच्चवर्ग होत आहे. स्त्रियांचे स्वातंत्र्य, कमावतेपण, बाहेर राहणे, प्रवास, मोबाईल यांतून विवाहपूर्व व विवाहबाह्य संबंधांचा आलेख गतीने वाढतो आहे. त्यात आपली स्पर्धा युरोप, अमेरिकेशी असावी असे चित्र आहे! छोट्या शहरांमधून व गावांतूनही मोटारसायकल लाँग रायडिंग, मुलींचे वाढते मास्क (ते प्रदूषणासाठी कमी, ओळख लपविण्यासाठी अधिक), मुलांच्या कॅपचा वाढता वापर, वीकएंड टूर्स, डे आउट, टर्म लॉजिंग (तासावर

एकविसाव्या शतकातील शिक्षण/८०