पान:एकविसाव्या शतकातील शिक्षण (Eakavisavya shatakatil shikshan).pdf/67

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अधिक वेळ बसू न शकणे, लिहू न शकणे इत्यादी ढोबळ दोषांमुळे त्यांना औपचारिक पुस्तकी शिक्षणाबरोबर व्यावसायिक शिक्षणाची गरज अधिक असते. हे शिक्षण व्यक्तिपरत्वे वेगळे असणे आवश्यक असते. शिक्षणातील अपंगांची प्रगती व्यक्तिमर्यादेनुरूप भिन्न असते. यामुळे अपंगांना औपचारिक शिक्षण देण्याबरोबर त्यांना उपजीविका देऊन स्वावलंबी बनविणारे शिक्षण देणे गरजेचे आहे. यासाठी त्यांना कृत्रिम अवयव पुरवणे, योग्य उपचार सुविधा प्रदान करणे, वाचाविकारग्रस्तांसाठी वाचिक प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. अपंगांच्या शिक्षणासाठी प्रशिक्षित शिक्षकांची गरज असते. आज त्यांची टंचाई आहे. शिवाय अपंगांना शिक्षण देण्यासाठी संवेदनशील, संयमी व सेवाभावी कार्यकर्त्यांची आत्यंतिक निकड असते. त्यांचीही प्रकर्षाने वाण आहे. अपंगांच्या शिक्षण सुविधांत वाढ होणे आवश्यकच नाही तर अनिवार्यही आहे.
 पूर्णतः अंधत्व आलेल्या किंवा सर्वसाधारण दृष्टीच्या एकदशांश इतकीच दृष्टी असलेल्या बालकांचा अंतर्भाव ‘अंध बालक' या संज्ञेत करतात. याशिवाय फूल पडणे, डोळ्यातील तांत्रिक, दृक्पटल, कनीनिका इत्यादी विकारग्रस्त बालकांचाही समावेश या वर्गात करता येईल. अंध बालके ही सर्वसाधारण बालकांच्या अनुभवविश्वाला पारखी असतात. असे अनुभवविश्व त्यांना बहाल करणे हे अंध बालकांच्या शिक्षणाचे उद्दिष्ट मानण्यात येते. अंध बालकांचे शिक्षण हे डोळस बालकांच्या औपचारिक शिक्षणापेक्षा फार वेगळे नसलं तरी ब्रेललिपीच्या शोधामुळे अंधांच्या शिक्षणात क्रांती घडून आली. प्रख्यात फ्रेंच समाजसेवक लुईस ब्रेल यांनी या लिपीचा विकास केला. ही लिपी सहा उठावांच्या टिंबांवर बसविलेली आहे. या लिपीत लिहायचे झाल्यास जाड कागदावर छिद्र असणारी एक विशिष्ट पट्टी ठेवतात. या पट्टीमुळे अक्षरे सरळ रेषेत व योग्य अंतरावर उठू शकतात. अक्षरे उठविण्यासाठी अणकुचीदार लोखंडी पेन्सिलचा वापर केला जातो. लिहून झाले की कागद उलटवून त्यावर हात फिरवून स्पर्शज्ञानाने वाचता येते. मराठी ब्रेल लिपी विकसित करण्यात आली असून तिचे जनक छत्रपती बंधू आहेत.

 अंध बालकांच्या शिक्षणात विविध ज्ञानेंद्रियांचा वापर करून शिकवले जातं. स्पर्श, गंध, श्रवण, रुची इत्यादी संवेदनाचा विकास करण्यासाठी पत्ते, उठावाची घड्याळे, उठावाचे नकाशे इत्यादी साधनांचा वापर केला जातो.अंधांच्या शाळा स्वतंत्र असतात. अलीकडे डोळस मुलांबरोबर अंधांना शिकवणे आदर्श मानले जाते.या पद्धतीमुळे अंधांमधील न्यूनगंड कमी होऊन शिक्षण

एकविसाव्या शतकातील शिक्षण/६६