पान:एकविसाव्या शतकातील शिक्षण (Eakavisavya shatakatil shikshan).pdf/6

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शोधनिबंध लिहिले. प्राचार्य, संचालक, संशोधन मार्गदर्शक अशा भूमिकांतूनही 'शिक्षण' विषयाचा विचार करता आला. श्री मौनी विद्यापीठ, गारगोटीमध्ये डिप्लोमा इन रुरल सर्व्हिसेस (एज्युकेशन) हा चार वर्षांचा बी. ए., बी. एड. समकक्ष अभ्यासक्रम शिकत असताना सिद्धान्त व उपयोजन अशा शिक्षणाच्या दोन्ही अंगांचा परिचय झाला. शिक्षक म्हणून मी ग्रामीण भागात अध्यापन सुरू केले. माध्यमिक स्तरावर सन १९७१ ते १९७९ असे आठ वर्षे अध्यापन केले. हिंदी, इंग्रजी, मराठी, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, समाजशास्त्र, कार्यानुभव, समाजसेवा, शरीर विज्ञान व आरोग्य काय नाही शिकवले? शिक्षक सर्व विषय शिकवतो तेव्हा काहीच धड शिकवत नसतो अशी माझी धारणा झाली ती या अनुभव वैविध्यामुळे. 'एक ना धड, भाराभर चिंध्या' म्हण आली ती शिक्षणातील दुरवस्थेमुळे. भारतात शिक्षणविषयक अनावस्थेला आपण कधी गंभीरपणे घेतलेले नाही. मंत्र्यांगणिक धोरणे बदलणे, सरकारगणिक शिक्षण योजना बदलणे या आपल्या धरसोड वृत्तीमुळे शिक्षणाचा कालानुगणिक सुसंगत विकास होऊ शकला नाही.
 जी गोष्ट शिक्षणाची तीच शिक्षकांची. 'शिक्षकांची घडण' हा आपल्या देशाच्या चिंता व चिंतनाचा विषय होऊ शकला नाही हे आपल्या विकासातील एक कटुसत्य आहे. शिक्षण प्रशिक्षण, शिक्षणशास्त्र महाविद्यालये, शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम यांचा किमान दर्जा व काळाची बदलती पावले ओळखून अभ्यासक्रम अद्ययावत करण्याबाबतची चालढकल, अनास्था केवळ अक्षम्य होय. राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद (National Council for Teacher Education) ही शिक्षणाविषयक मार्गदर्शक संस्था म्हणून आपण विकसित न केल्याने शिक्षणशास्त्र महाविद्यालयांना परवाना देणारे ते केवळ वितरण केंद्र झाले. पारंपरिक विद्यापीठातील शिक्षण विभागाने मूलभूत संशोधनाची अपेक्षित जबाबदारी पार पाडली नाही. परिणामी शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील प्रशिक्षण देणारा प्राध्यापक संशोधक न राहता पाठ निरीक्षक (Method Master) झाला. तेथून निर्माण होणारे शिक्षक पाठोपाठ पाठ घेणारे शिक्षक बनून बाहेर पडले. शिक्षणात संशोधन, प्रकल्प, लेखन, अध्यापन पद्धती विकास इ. क्षेत्रात फार बदल घडून आले असे म्हणणे धाडसाचे ठरावे. आज एकविसाव्या शतकाचे पहिले दशक सरले. लॅपटॉपचा, पॉवर पॉईंटचा जितका उपयोग व्यवसाय, व्यापारात होतो, तितका शाळा, महाविद्यालये, प्रशिक्षण संस्थात होत नाही.आजही पाठांसाठी गुंडाळी फळे, तक्ते वापरले जातात. याला काय म्हणाल? ‘आभासी ज्ञानरंजक शिक्षण' दारावर येऊन ठकठकू लागले तरी शिक्षक ‘संगणक साक्षर' होऊ नये हे केवळ अनाकलनीय!