पान:एकविसाव्या शतकातील शिक्षण (Eakavisavya shatakatil shikshan).pdf/57

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आबाळ झाली असाच निष्कर्ष काढावा लागेल. दक्षिण महाराष्ट्र व उत्तर कर्नाटक प्रांतांचाच विचार करावयाचा झाला तर अनाथ, निराधार बालकांच्या शिक्षणासाठी गेल्या ५० वर्षांत जितक्या संस्था निघाल्या त्या तुलनेने अपंग नि अंधांच्या निघाल्या नाहीत, असे दिसून येते. या सर्व विहंगमावलोकनामुळे भविष्यकाळात अनाथ, निराधार, बालगुन्हेगार, अंध, अपंग यांच्या संगोपन व शिक्षणविषयक गरजा लक्षात घेऊन अधिक प्रबोधन होणे अनिवार्य वाटते. यासाठी सामाजिक, राजकीय व शासकीय पातळीवर नियोजनबद्ध प्रयत्नांची गरज आहे. वंचितांचे शिक्षण, पुनर्वसन हा दयेचा भाग नसून सामाजिक व नैसर्गिक न्यायाच्या दृष्टीने अग्रक्रमाचा भाग आहे, हे लक्षात घेण्याची वेळ आली आहे. त्यातही वंचित बालकांच्या शिक्षणविषयक गरजांची पूर्ती प्राधान्यक्रमाने व्हायला हवी.
 सन १९८१ च्या जनगणनेच्या वेळी भारताची लोकसंख्या ६८ कोटी ५१ लक्ष होती. त्या वेळी केलेल्या पाहणीनुसार ० ते १४ वयोगटातील बालकांची संख्या ९ कोटी ७१ लक्ष इतकी दिसून आली. म्हणजेच बालकांची संख्या एकूण लोकसंख्येच्या १४.१७टक्के इतकी होती असे दिसून येते. या ९ कोटी ७१ लक्ष बालकांत १०टक्के बालके ही अनाथ, निराधार, बालगुन्हेगार, अंध, अपंग, मतिमंद अशी आढळून आली. ही अशी वंचित बालके की ज्यांना संगोपन, शिक्षण, विकास, सुसंस्कार व पुनर्वसनासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या संस्थांची गरज होती. दोन वर्षांपूर्वी म्हणजे सन १९८६ च्या अंदाजानुसार या देशात १ कोटी ४० लक्ष मुले अनाथ, २ लाख बालगुन्हेगार, तर ११ लाख अपंग असल्याचे सांगण्यात आले. इतक्या मोठ्या संख्येने असलेल्या या उपेक्षित बालकांकडे गेल्या ४० वर्षात जितक्या गांभीर्याने पाहायला हवे होते तितके पाहिले न गेल्याने स्वातंत्र्योत्तर काळातील किमान तीन वंचितांच्या पिढ्या उपेक्षित राहिल्या. या उपेक्षेमुळे बालमृत्यू, वंचित बालके अशिक्षित राहणे व त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास न झाल्याने सुमार दर्जाचे जीवन जगण्याची नामुष्की गेल्या तीन पिढ्यांतील बालकांवर आली, हे खेदाने नमूद करावे लागते.

 ज्या अनाथाश्रम, अर्भकालय, बालगृहे, अभिक्षणगृहे प्रमाणित शाळा, निराश्रित मुलांची वसतिगृहे, अनुरक्षण गृहे, अंधशाळा, अपंग पुनर्वसन केंद्रे, अपंगमती विद्यालये इत्यादींमध्ये उपरोक्त वंचित बालकांना आश्रय घ्यावा लागला, तेथील सुमार सुविधा, साचेबंध प्रशासन, व्यक्तिगत चिकित्सेची आबाळ, अपुरी साधने इत्यादींमुळे बालकांना जुजबी शिक्षण जरूर मिळाले;

एकविसाव्या शतकातील शिक्षण/५६