पान:एकविसाव्या शतकातील शिक्षण (Eakavisavya shatakatil shikshan).pdf/54

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तरतूद अत्यल्प आहे, हे वेगळे सांगायची गरज नाही. या वर्गाच्या शिक्षणासाठी पुरविली जाणारी साधने व योजना इतक्या तुटपुंज्या आहेत की, शासन व समाज यांना जाणीवपूर्वक परिघावरच ठेवू इच्छिते की काय अशी साधार शंका वाटावी, अशी सारी स्थिती आहे.
 स्वातंत्र्योत्तर काळात मुलींच्या शिक्षणासाठी केले गेलेले उपाय व योजना हेदेखील दलित शिक्षणासारखेच राजकीय घोषणांचे युद्ध होय. अजूनही येथील मुलींचे शिक्षण हे सार्वत्रिकरीत्या प्राथमिक शिक्षणाच्या सरासरीपलीकडे गेलेले नाही. शहरी व ग्रामीण भागांतील मुलींच्या शिक्षणातील दरी हेच स्पष्ट करते. मुलींचे प्राथमिक स्तरानंतर गळतीचे प्रमाण रोखण्याचे उपाय आपणास करता आलेले नाहीत. खेड्यांतील बालविवाहांचे प्रमाण चिंता करण्यासारखे आहे. स्त्रियांवर सतत वाढत जाणारे अत्याचार हादेखील स्त्री-शिक्षणाच्या संदर्भात आपण केलेल्या उपेक्षेचाच परिणाम होय. दारिद्रयरेषेखालील कुटुंबात मुलींच्या आहार व शिक्षणाकडे केले जाणारे दुर्लक्ष आपण थोपवू शकलो नाही. परिणामी बालवेश्यांचे प्रमाण आपल्याकडे जागतिक क्रमवारीत वरचे स्थान देणारे आहे, हेच अस्वस्थ करणारे आहे. यामध्ये पोखरलेली प्रशासन व्यवस्था हे जसे एक कारण आहे, तसे अशा प्रश्नांसंदर्भात लोकजागृतीचा अभाव हेही तितकेच महत्त्वाचे कारण असल्याचे आपणास दिसून येईल. मध्यंतरी अशा काही अल्पवयीन मुलींना वेश्या व्यवसाय करण्याचा अपराध म्हणून न्यायालयीन आदेशानुसार पकडल्यानंतर शासनाची त्यांची शिक्षण व विकासाच्या संदर्भात उडालेली त्रेधातिरपीट ही आपण या प्रश्नाकडे लक्ष न दिल्याचेच निदर्शक आहे.
 ‘रस्त्यावरील मुलांचा प्रश्न' तर यापेक्षा भयंकर आहे. या मुलांसाठी स्वयंसेवी संस्थांनी घेतलेल्या पुढाकारातून शासनाच्या मदतीनं रेल्वेच्या फलाटावरील जिन्याच्या खाली साहित्य ठेवायला एक छोटी खोली पुरवू शकलो, इतकेच काय ते यश गेल्या सत्तर वर्षांत आपण मिळवू शकलो, हे विदारक सत्य आहे. या मुलांना गेल्या सत्तर वर्षांत आपण पूर्णपणे साक्षर करू शकलो नाही, यासारखे आपल्या योजनेचे दिवाळे ते दुसरे कोणते असणार?

 जंगल, डोंगर यांच्या कुशीत वसलेल्या व अद्याप वीज, पाणी, रस्ते अशा मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या आदिवासी समाजातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न हादेखील सत्तर वर्षांतील परिघावरील वर्गाच्या उपेक्षेचे आणखी एक व्यवच्छेदक उदाहरण होय. आश्रमशाळा नावाने कार्यरत असलेल्या शिक्षणव्यवस्थेत सत्ताधारी राजकीय हस्तकांच्या त्या 'आश्रमशाळा' झाल्या

एकविसाव्या शतकातील शिक्षण/५३