पान:एकविसाव्या शतकातील शिक्षण (Eakavisavya shatakatil shikshan).pdf/52

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

राहिल्या. परिणामी विकासाचा ज्यांचा प्रथम हक्क असा वंचितांचा एक वर्ग अल्पसंख्य व उपेक्षित असल्यामुळे विकासाच्या कार्यक्रमपत्रिकेवर उपेक्षितच राहिला. राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे या वर्गाच्या संगोपन, संरक्षणासाठी आपण जुजबी तरतुदी जरूर केल्या; परंतु व्यापक व गुणवत्ताकेंद्री शिक्षणाच्या मजबूत पायावर या वर्गास समाजाच्या मध्यप्रवाहात आणण्याचे लक्ष्य आपला देश ठरवू शकला नाही. हे विदारक सत्य देशाच्या प्रगतीचा ढोल पिटणा-यांना चपराक देणारे ठरले, तर आश्चर्य वाटायला नको. अनाथ, निराधार, दारिद्र्यरेषेखालील बालके, बालमजूर, अल्पवयीन वेश्या, रस्त्यावरची मुले, कुष्ठपीडित परिवार, देवदासी, अंध, अपंग, मतिमंद हा समाजाचा एक असा वंचित वर्ग आहे, की जगभर याच्यासाठी प्राधान्यक्रमाने शिक्षण व विकासाच्या योजना आखल्या जातात, त्यांच्यासाठी मोठी आर्थिक तरतूद केली जाते, यंत्रणेचे मोठे जाळे या वर्गाच्या शिक्षणासाठी सतत कार्यरत असते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण सार्वत्रिक शिक्षणाचे धोरण स्वीकारले. सार्वत्रिक शिक्षणाच्या संकल्पनेत वंचितांचा हा वर्ग प्राधान्यक्रमाने यायला हवा होता; परंतु तसे झाले नाही. राजकीय इच्छाशक्तीने साक्षरता, दलितांचे शिक्षण, व्यावसायिक शिक्षण यासारख्या गोष्टींना प्राधान्य दिल्याचे दिसून येते. हुकमी मतांचे गणित या सर्व योजनांमध्ये काम करीत होते, हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे.
 स्वातंत्र्योत्तर काळात बालशिक्षणाच्या क्षेत्रात संख्यात्मक प्रगतीमागेच आपण राहिलो. परिणामी बालशिक्षणात सर्जनात्मक व आनंददायी शिक्षणाची पहाट होऊच शकली नाही. पटसंख्यावाढीकडे आपण आपले सारे लक्ष केंद्रित केले. गाव तेथे शाळा, ऑपरेशन ब्लॅकबोर्ड, साक्षरता प्रसार, मूल्याधिष्ठित शिक्षण अशा मोठमोठ्या नावांच्या योजना आपण कार्यान्वित केल्या ख-या; पण उपेक्षित यशपूर्तीच्या कसोटीवर आपल्या पदरी निराशाच आली. याची कारणमीमांसा करताना लक्षात येते की, अपुरे नियोजन, अपुरी तरतूद ही जशी या अपयशाची कारणे आहेत, तशी ‘झटपट लॉटरी'च्या धरतीवर ‘झटपट यशप्राप्तीची घिसाडघाई' हेही एक कारण होय. परिणामी बालशिक्षणदेखील गुणवत्तेच्या पातळीवर परिघावरच राहिल्यासारखी स्थिती आहे.

 अनाथ, निराधार, दारिद्र्यरेषेखालील बालके, वेश्या, कुष्ठरोगी, देवदासी यांची आपद्ग्रस्त अपत्ये, भिक्षेक-यांची मुले-मुली, भटक्या व विमुक्त जातींची मुलं अशा समाजातील सर्वथा वंचित व उपेक्षित बालकांच्या शिक्षणासाठी ज्या जाणीवपूर्वक प्रयत्नांची गरज होती, त्याकडेही आपले

एकविसाव्या शतकातील शिक्षण/५१