पान:एकविसाव्या शतकातील शिक्षण (Eakavisavya shatakatil shikshan).pdf/49

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 प्राथमिक स्तरावर दोन भाषा (मराठी व इंग्रजी), दोन विज्ञान (परिसर अभ्यास, गणित), दोन कला (संगीत, चित्रकला), एक जीवन शिक्षण (कार्यानुभव) सारखे विषय इयत्ता पहिलीस शिकविले जातात. पाच वर्षे पूर्ण असलेल्या मुलाची भाषिक क्षमता एक भाषा ग्रहण करायची नसताना आपण दोन भाषांचे गोंधळ कोवळ्या वयात निर्माण करतो. आपणास काय हवे यापेक्षा मुलाची क्षमता काय याचा विचार नको का व्हायला? आपले सारे शिक्षण ‘बाल्यकेंद्रित न राहता पालककेंद्रित झालेय. शासन व पालक आपली स्वप्ने पाल्य व प्रजेवर लादत आहेत. खलिल जिब्राननी आपल्या ‘प्रोफेट'मध्ये सांगितलेलं गंभीर चिंतन आपण दुर्लक्षित करतो. तो म्हणतो, “तुम्ही आपल्या पाल्यास सर्व काही द्या. फक्त तुमचे विचार व स्वप्ने देऊ नका; कारण ती आपली घेऊन जन्मलेली असतात. मुलांच्या स्वतःच्या स्वप्ने आणि विचारांची नोंद आपण घेणार की नाह हा खरा प्रश्न आहे. प्राण्यांना आवाज असतो. मनुष्यास भाषा असते. भाषा विचाराधारित व्यवस्था आहे. ती कौशल्य होय. ती बालपणी कमजोर असते. तिचे आकलन नि उपयोजन बालपणी क्षीण असते. ते मातृभाषेत जितके गतिशील तितके अथवा अन्य भाषेत असत नाही. भाषा आविष्कार माध्यम होय. ते आकलनाचे साधन होय. मातृभाषेतील आकलन जितके गहिरे तितके आविष्करण प्रभावी. भाषेच्या या मूलभूत कल्पनांवर भाषाशक्षणविषयक धोरण निश्चित करण्याची गरज आहे. एकभाषी बोध निश्चित झाला की मनुष्य अन्य भाषी बोधाचे आकलन सहज करू शकतो. मातृभाषा शिक्षण जितके शास्त्रशुद्ध, प्रभावी तितकी अन्य भाषाग्रहण क्षमता अधिक हे सर्वमान्य तत्त्व होय. या पार्श्वभूमीवर पहिलीला इंग्रजी अनिवार्य करणे हे अशास्त्रीय, अशैक्षणिकच नाही तर अमानवीयही ठरावे. भाषाशिक्षण म्हणजे केवळ संकेत ग्रहण नव्हे, तर संकेतांचा प्रसंगोचित परस्पर संबंधी वापर होय. ए टू झेड नि वन टू हंड्रेड येणे म्हणजे इंग्रजी भाषा नव्हे, तर सारासार बुद्धीने भाषिकसंकेत वापरता येणं म्हणजे भाषा शिक्षण. मूळ भाषेच्या सामान्यज्ञानावर अन्य भाषाकौशल्य अवलंबून असते. 'Though the common sense is common, but it founds uncommonly' हे विसरून चालणार नाही. बालवयात दोन भाषा एकावेळी आपण हे गृहीत धरलेय की सगळ्यांचा बुद्ध्यांक सरासरीपेक्षा अधिक आहे. खरे शिक्षण हे कलचाचणी घेऊन सुरू होते, हे स्वातंत्र्याच्या गेल्या ७० वर्षांच्या प्रवासानंतरही आपल्या ध्यानी येत नाही याला काय म्हणावे? प्राथमिक शिक्षण हे बालक्षमतांचा विचार करून दिले गेले पाहिजे. ते बाल्य आनंददायी बनवणारे, रंजनक्षम,

एकविसाव्या शतकातील शिक्षण/४८