पान:एकविसाव्या शतकातील शिक्षण (Eakavisavya shatakatil shikshan).pdf/46

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पण अवघ्या वीस वर्षांत त्यांनी शाळेला जाण्यायोग्य सर्व मुले शाळेत आणली. असेच इंग्लंडचेही उदाहरण आहे. मानवी संसाधन समृद्धीचे महत्त्व जोवर आपण मान्य करून अमलात आणणार नाही, तोवर ही हेळसांड थांबणे केवळ अशक्य.
 ‘योजना दशकाची असेल तर झाडे लावा; पण शतकाची असेल तर मात्र शाळा उघडा,' असे एका चिनी म्हणीत सांगितले आहे. शिक्षणातून येणारा बदल शतकाचे स्वरूप बदलतो हे जरी खरे असलं तरी तो आपला प्रभाव सहस्रकावर टाकत असतो हे लक्षात घ्यायला हवं. म्हणून थायलंडमधील जॉमटिनमध्ये ५ ते ९ मार्च, १९९० या काळात भरलेल्या शिक्षणविषयक जागतिक परिषदेत ‘सार्वत्रिक शिक्षणाचा जाहीरनामा' प्रसृत करण्यात आला असून ‘शिक्षणाच्या मूलभूत गरजांवर त्यात भर देण्यात आला आहे.

 प्राथमिक शिक्षणाची सतत चिंता आणि चिंतन करणारा एक सामान्य नागरिक, कार्यकर्ता, पालक म्हणून या सर्व विदारक स्थितीचे वैषम्य वाटल्यावाचून राहत नाही. हे सर्व चित्र बदलायला हवे. त्यासाठी वर्तमान शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणले पाहिजेत. शिक्षणाची मुलांना काय गरज आहे यापेक्षा मुले काय शिकू इच्छितात याचा विचार व्हायला हवा. हे क्रियात्मक, निर्मितीक्षम तर असायला हवे, शिवाय त्यातून मुलांना आनंद मिळेल, असे आपण पाहायला हवे. चेतनादायी शिक्षणासाठी चैतन्यशील शिक्षक निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न व्हायला हवा. पाठांतर करून पाठ घेणारे शिक्षक घडविणारी प्रशिक्षणे महाविद्यालये, त्यांचे स्वरूप व कार्यपद्धती बदलायला हवी. शिक्षणावर सतत चढत्या भाजणीने तरतूद होत राहायला हवी. शिक्षणविषयक धोरण सरकारागणिक बदलून चालणार नाही. ‘राष्ट्रवंदना’ की ‘सरस्वती वंदना'सारखा विषय स्वातंत्र्याच्या पन्नास वर्षांच्या प्रयत्नांनंतरही उभारतो हे पाहता आपणास राष्ट्रउभारणीपेक्षा मननिर्मितीमध्येच अधिक रस असल्याचे दर्शवितो. शिक्षणासंबंधी राजकीय पोरखेळ थांबायला हवेत. त्यासाठी न्यायासारखे शिक्षणही स्वायत्त आणि स्वतंत्र व्हायला हवे. प्राथमिक शिक्षणाच्या मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीचा भाग हा सरकारच्या इच्छेचा भाग न राहता ती वैधानिक जबाबदारी व्हायला हवी. प्राथमिक शिक्षण केवळ उपचार न राहता ती गंभीर कृती बनायला हवी. प्राथमिक शिक्षण हे आपल्या राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक जडणघडणीचे प्रभावी साधन आहे, हे लक्षात घेऊन या प्रश्नाचा जाणीवपूर्वक मागोवा घेत राहिलं पाहिजे.

एकविसाव्या शतकातील शिक्षण/४५