पान:एकविसाव्या शतकातील शिक्षण (Eakavisavya shatakatil shikshan).pdf/30

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अध्यापकांच्या या सोशिकतेचे ‘प्रतीक' म्हणून समाज त्यास प्रतिष्ठित मानत होता. अध्यापकही अल्पसंतुष्ट होते.
 परंतु स्वातंत्र्योत्तर काळात परिस्थितीमध्ये आमूलाग्र परिवर्तत झाले. स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही, समाजवाद इत्यादींचे वारे वाहू लागले. स्वत्व जाणण्याच्या कल्पनेने व भारतीय जनमानसात नित्य प्रवेशणाच्या नवनवीन कल्पनांनी जीवनमूल्ये व जीवनदृष्टीच बदलून टाकली. सामाजिक तळागाळाच्या माणसासही आपल्या स्वतंत्र अस्तित्वाचे भान आले. या बदलत्या परिस्थितीत समाजातील ‘अध्यापक' हा विशेष संवेदनाक्षम घटक जागृत होणे स्वाभाविकच म्हणावे लागेल. समाजातील घटकाप्रमाणे अध्यापकांनीही आपल्या संघटना बांधल्या. या विविध काळात सेवाशक्ती, वेतननिश्चिती, सेवानियम, सेवाज्येष्ठता यांसारख्या प्राथमिक परंतु अत्यावश्यक मागण्या घेऊन प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन, विद्यापीठीय स्तरांवर वेगवेगळ्या संघटना निर्माण झाल्या. या संघटना अन्याय निवारणाच्या एकाच पायावर उभ्या होत्या, याचा आपल्याला विसर पडता कामा नये. अध्यापकांनी लढ्याच्या मार्गाने मिळविलेले न्याय्य अधिकार हे खासगी संस्थांना आपल्या अधिकारात हस्तक्षेप व अतिक्रमण वाटू लागले होते.
 स्वातंत्र्योत्तर काळात खासगी शिक्षण संस्थांना दिल्या जाणा-या अनुदानात वेतनमानाप्रमाणेच वाढ होत गेली. २ टक्क्यांपासून सुरू झालेले अनुदान स्वातंत्र्याच्या तीन दशकांतच १०० टक्क्यांवर येऊन पोहोचले. खासगी शिक्षण संस्थांकडे समाजाचा, शासनाचा निधी भूमितीच्या पटीने वाढत गेला. साहजिकच असा प्रश्न आता चर्चिला जाऊ लागला आहे की, शासन जर १० टक्के अनुदान देत असेल तर शिक्षणसंस्थांत खासगी संस्थांचे वर्चस्व का? ऐतिहासिक पुण्याईवर संस्थानिक या देशात जगू शकत नसतील तर संस्थाचालकांना अनभिषिक्त साम्राज्य का हवे? या संदर्भात एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की लोकशाहीकरणाची मागणी १० टक्के अनुदान मिळते म्हणून नाही, तशीच ती संस्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठीही नाही. कोणत्याही क्षेत्रात अनिर्बध सत्ता असणे समाजहिताचे होणार नाही. Power corrupts and absolute power corrupts absolutely हे सूत्र या संदर्भात लक्षात घ्यायला हवे.

 लोकशाहीत लोकशिक्षण व लोकमत ही सुधारणेची प्रभावी शस्त्रे असतात. या साधनांचा वापर आपण शिक्षणक्षेत्रात जितक्या प्रभावी स्वरूपात करू शकतो तितका तो अन्य कोणत्याही क्षेत्रात शक्य नसतो. देशांतर्गत लोकशाही रुजविण्याचा श्रीगणेशा शिक्षणक्षेत्रातून व्हायला हवा.

एकविसाव्या शतकातील शिक्षण/२९