पान:एकविसाव्या शतकातील शिक्षण (Eakavisavya shatakatil shikshan).pdf/27

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अमेरिका
 चांगले शिक्षक घडवायचे तर प्रशिक्षण उत्कृष्ट हवे, हे लक्षात घेऊन अमेरिका शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम काळजीपूर्वक राबविते. तेथील 'बोस्टन रेसिडेन्सी संस्था या क्षेत्रात अग्रगण्य मानली जाते. तिथे प्रवेश मिळण्यासाठी छात्राध्यापक वा प्रशिक्षणार्थी शिक्षकांना दोन महिन्यांच्या ‘समर स्कूल'मध्ये जावे लागते. तिथे शिक्षक पदाचे महत्त्व, कार्य, जबाबदा-या यांबाबत जाणीवजागृतीवर भर दिला जातो. ती ज्यांच्यात होते त्यांना काही कसोट्यांवर शिक्षकपूर्व प्रशिक्षणासाठी निवडले जाते. प्रशिक्षण कालावधीत पाच दिवसांचा आठवडा असतो. पहिल्या वर्षी आठवड्यातील चार दिवस व्याख्याने, अध्यापन, प्रात्यक्षिके असतात. पाचवा दिवस समूहचर्चा, परिसंवाद/चर्चासत्रांचा असतो. एक वर्ष प्रशिक्षण पूर्ण केल्यावर शिक्षकास ‘लायसेन्स' दिले जाते. त्याला ‘वर्क परमिट'ही मानतात. नंतर त्याला पदवी बहाल केली जाते. तेथील प्रशिक्षण महाविद्यालयेच नोकरी देण्याचं कार्य करतात. प्रशिक्षित शिक्षकांपैकी १३टक्के लोकांनाच सध्या नोक-या उपलब्ध होतात. कारण तितकेच पास केले जातात. जेवढी पदे आवश्यक तितकेच उत्तीर्ण होत असल्याने १००टक्के नोकरी असते. अमेरिकेत आजही ४०टक्के शिक्षकांची पद रिक्त आहेत. पात्र शिक्षक मिळाल्यासच नेमायचे तेथील धोरण याला कारणीभूत आहे. प्रशिक्षण विकास कार्यक्रमावर अमेरिका मोठा पैसा खर्च करते. परिणामी प्रशिक्षित उत्कृष्ट शिक्षकच बाहेर पडतात. विदेशी शिक्षकांना तिथे मोठा वाव असला तरी तेथील चाळणीतून नोकरी मिळणे ही कसोटी असते.

 अमेरिका जगासाठी उदार राज्य असले तरी शिक्षकांसाठी ते मोठे चिकित्सक असतात. त्यामुळे शिक्षकांचा दर्जा' हा तिथला नेहमीच कळीचा मुद्दा असतो. "Publish or Perish" हे तत्त्व अंगीकारले असल्याने शिक्षक स्वतःच नेहमी अद्ययावत (up date) बनवत राहतो व स्वतःच उत्कृष्ट होत राहतो. जे स्वतःला विकसित करीत नाहीत ते आपोआप व्यवसायाबाहेर पडतात. आपल्याकडे शिक्षकांच्या गुणवत्तेचा प्रश्न खोगीरभरतीतून निर्माण झाला आहे. शिवाय निरंतर विकासाची योजना आपणाकडे नाही. व्यवसायात आल्यापासून निवृत्तीपर्यंत अधिक काही केले नाही तरी चालते. असे साखळी पद्धतीचं नोकरीसातत्य हा आपल्या व्यवस्थेतील खरा अडसर होय. त्यात मूलभूत स्वरूपाचे बदल केल्याशिवाय उत्कृष्ट शिक्षक घडणीची प्रक्रिया सक्रीय होणार नाही.

एकविसाव्या शतकातील शिक्षण/२६