पान:एकविसाव्या शतकातील शिक्षण (Eakavisavya shatakatil shikshan).pdf/26

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

चीन

 चीन व भारत या दोन्ही देशांत मोठ्या जनसंख्येस शिक्षण देण्याचे समान आव्हान असले तरी समस्या समाधानात चीन आपल्यापुढे एक पाऊल निश्चित आहे. उत्कृष्ट शिक्षक घडणीत चीन प्रशिक्षणपूर्व कालावधीकडेही लक्ष देऊन असतो. प्राथमिक स्तरावर व्यक्तिगत लक्ष देण्यावर त्यांचा भर असल्यानं जी मागे पडणारी मुले असतात, त्यांना एकत्र करून विशेष शिक्षण दिले जाते. ‘किमान गुणवत्तेचे कमाल विद्यार्थी असे प्राथमिक ध्येय घेऊन ते राबतात. शिक्षक प्रशिक्षण हे अध्यापन करणा-या अनुभवी शिक्षकांमार्फत देण्यावर ते भर देतात. चांगले शिक्षक तयार व्हावेत म्हणून तेथील शाळात अनौपचारिक निरंतर प्रशिक्षणाचा विशेष अंतर्भाव केला आहे. त्या अंतर्गत शाळेतील शिक्षक रिकाम्या वेळेत एकमेकांच्या तासांना जाऊन बसतात. नोंदी ठेवतात.आपसांत अनौपचारिक चर्चा करतात. ज्येष्ठ शिक्षक कनिष्ठांना मार्गदर्शन करतात. हे त्यांच्या दैनंदिन कार्यातील आवश्यक काम मानण्यात येते व ते अनिवार्य असते. विषयशिक्षकांची अभ्यास मंडळे असतात. नवशिक्षित शिक्षकांना अनुभवसंपन्न बनवणे यास ते विशेष महत्त्व देतात. शिक्षण गुणवत्ता विकास ही तेथील शिक्षण विभागाची जबाबदारी असते. आपले शिक्षणाधिकारी केवळ निरीक्षण (Inspection) व नियंत्रण (Control) चे कार्य करतात. तेथील शिक्षणाधिकारी आदर्श पाठ घेणे (Model Lesson), प्रात्यक्षिक व प्रशिक्षण कार्य करतात. आपणाकडे अधिकारी फक्त प्रशिक्षणाचे आदेश, परिपत्रके काढतात. शिक्षकांसाठी तिथे पदोन्नती चार प्रकारे/कसोट्या लावून दिली जाते. १) आदर्श पाठ घेण्याची क्षमता २) नवे शिक्षण निर्माण करण्याची क्षमता ३) नियतकालिक, संशोधन पत्रिकांत लेखन ४) अध्ययन, अध्यापनविषयक प्रकाशन (ग्रंथ). पदोन्नत शिक्षकाची नियुक्ती मोठ्या जबाबदारीच्या पदावर (प्रशिक्षक, प्रात्यक्षिक कार्यकर्ता) केली जाते. वेतनमानही वाढीव असते. निवडक शाळांना प्रयोगशील, उपक्रमशील व संशोधन शाळा म्हणून मान्यता देऊन तिथे प्रज्ञावंत शिक्षक नियुक्त केले जातात. शिक्षक व शिक्षण हे दोन्ही विकास एकाच वेळी घडण्याची किमया यातून साधली जाते. आपल्यासारखाच सार्वत्रिक शिक्षणाचा त्यांचा प्रश्न आहे; पण समाजवादी रचनेमुळे वंचित घटकांच्या शिक्षणविकासावर लक्ष त्यांचे असते. तरी तिथे अल्पशिक्षित वर्गाची आपणासारखीच समस्या आहेच. तिथे काही गोष्टी अनिवार्य असल्याने उत्कृष्ट शिक्षकांची गुणवत्ता नियंत्रित होत राहते. पळवाटीस फारसा वाव नसतो.

एकविसाव्या शतकातील शिक्षण/२५