पान:एकविसाव्या शतकातील शिक्षण (Eakavisavya shatakatil shikshan).pdf/25

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

फिनलंड
 शिक्षणात जगातील पहिल्या पाच देशांत मानाचे स्थान पटकावणारा युरोप खंडातील छोटा देश फिनलंड. या देशानं गेल्या दशकात शिक्षकनिर्मितीवर लक्ष केंद्रित केले आणि आपल्या देशातील शिक्षण श्रेष्ठ दर्जाचे बनविले. त्यासाठी शिक्षक व्यवसाय हा देशातील पहिल्या दर्जाच्या तीन व्यवसायांसमकक्ष बनविला. डॉक्टर, इंजिनिअर व शिक्षक. त्यासाठी देशाने विशेष असा कृती संशोधन प्रकल्प राबविला. एक छोटी परंतु शिक्षक व्यवसाय सन्मानित करणारी गोष्ट केली. बालवाडीपासून ते विद्यापीठापर्यंत सर्वांना एकच ‘शिक्षक पदनाम दिले. म्हणजे प्राध्यापक, प्रपाठक इत्यादी नाही. शिक्षक निवडीचे कठोर निकष अमलात आणले. गतवर्षी शिक्षकभरतीसाठी आलेल्या ६६०० अर्जातून केवळ ६६० शिक्षकच नेमले गेले. आज ह्या देशांत शिक्षकपद प्रतिष्ठित असले तरी ते येरागबाळ्याचे काम राहिले नाही. शिक्षकांना शाळेत प्रयोग व उपक्रमाचे नुसते स्वातंत्र्य देऊन हा देश थांबला नाही, तर वर्गात शिक्षक स्वायत्त व सर्वेसर्वा इथवर आता त्यांनी मजल मारल्यामुळे ते जगातील श्रेष्ठ शिक्षण देऊ शकतात. तिथे शिक्षक होण्यासाठी ज्या पदव्या दिल्या जातात, त्या सर्व कृती संशोधनावर आधारित असतात. शिक्षणाच्या व विद्यार्थ्यांच्या दर्जास शिक्षक व शाळा जबाबदार असे बांधील धोरण त्या देशानं स्वीकारल्याने उत्कृष्ट शिक्षक-घडणीस पर्यायाने गती मिळाल्याचे दिसून येते. आपणाकडे असे बांधिलकीचे तत्त्व अंगीकारले तर शिक्षक गुणवत्तेत सुधारणा होणे शक्य आहे.

 फिनलंडमध्ये शैक्षणिक पर्यावरण सकारात्मक राहावे म्हणून जे अनेक प्रयत्न केले जातात, त्यात सार्वमत (Consensus) घेण्याची पद्धत आहे. शिक्षण धोरण केवळ शासन ठरवित नाही तर स्थानिक स्वराज्य संस्था, शिक्षक संघटना, शिक्षणतज्ज्ञ या सर्वांना विश्वासात घेतले जाते. पालक व विद्यार्थ्यांच्या मतांचाही विचार होतो. यातून निकोप शिक्षण तयार होते. शिक्षक व व्यवस्थापनात कराराची असलेली तरतूद उभयपक्षी शाश्वती देणारी ठरली आहे. फिनलंड हा मनुष्यविकास, शिक्षक-विद्यार्थी प्रमाण, शिक्षणावर होणारा खर्च, शिक्षक वेतन व शिक्षणात नव्या तंत्रज्ञानाचा वापर अशा अनेक कसोट्यांवर जगातील पहिल्या पाच देशांत आहे, त्याचे रहस्य तिथले शिक्षकही त्या दर्जाचे आहेत हे ओघाने आलेच. शिक्षण धोरणविषयक फिनलंडच्या नीतीतून भारतास बरेच घेता येईल व येथील शिक्षकांना उत्कृष्ट बनविता येईल.

एकविसाव्या शतकातील शिक्षण/२४