पान:एकविसाव्या शतकातील शिक्षण (Eakavisavya shatakatil shikshan).pdf/22

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

उच्च माध्यमिक स्तरांवर उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. जगभर असे आहे. आपणाकडे का नाही? ‘सब घोडे बारा टक्के' (All are equal) धोरणात विकासाची ऊर्जा व ऊर्मी नसते. त्यासाठी पुरस्कार व शिक्षा (Reward and punishment) दोन्ही तरतुदी हव्यात. उपक्रमशीलता, प्रयोग, संशोधन, लेखन, प्रकाशन, वक्तृत्व (प्रबोधन) समाजकार्य इत्यादी वृत्ती व गुणांचा संबंध पदोन्नतीशी जोडून विविध पदनिर्मितीवर भर दिला पाहिजे. पदवैविध्याबरोबर वेतनमान वैविध्यही असायला हवेच. उत्कृष्टता व गुणवत्तेच्या कसोट्यांवर पुरस्कार हवेत. आदर्श शिक्षक पुरस्कार अर्ज, प्रस्ताव सादरीकरणावर दिले न जाता मुलाखत, संशोधन, कृती कार्यक्रम, उपक्रमशीलता इत्यादींवर आणि तेही स्वतंत्र यंत्रणेतर्फे निवड करून दिले जावे, तर गुणवत्ताप्रधान शिक्षक घडणीस गती मिळेल.
 केंद्र व राज्य शासनाचे शिक्षणविषयक सध्याचे धोरण हे जागतिकीकरण, उदारीकरण, खासगीकरण इत्यादींचे असल्याने एका अर्थाने ते निर्गुतवणुकीचेच (Disinvestment) होत आहे. ते ‘कल्याणकारी राज्य संकल्पना मोडीत काढणारे जसे आहे, तसे शिक्षणात द्विवर्ण पद्धती असणारे आहे. गरिबांचे व श्रीमंतांचे शिक्षण असे दोन प्रवाह विकसित करणारे, विद्यमान स्वायत्त अर्थशास्त्री शिक्षण संस्था धोरण शैक्षणिक पर्यावरण विषम करीत आहेत. शिक्षकांना वेठबिगार बनविणारी यंत्रणा उत्कृष्ट शिक्षक घडणीची कार्यशाळा वा प्रयोगशाळा कशी होणार?

 या सर्व पार्श्वभूमीवर जगात काय काय प्रश्न होते, त्यांवर अन्यत्र काय प्रयत्न केले गेले, धोरणात काय बदल केले ते जर आपण जाणून घेतले तर आपणाला विद्यमान परिस्थिती बदलायचा मार्ग सापडू शकेल. एक तर भारतात परंपरेने शिक्षक व्यवसायाला सामाजिक प्रतिष्ठा व मान आहे. तो आपल्या सांस्कृतिक परंपरेचाही भाग आहे. मधल्या काळात झालेली पडझड दुरुस्त होणे सहज शक्य आहे. संभावनेचे आकाश ढगांनी भरले असले तरी ढग पांगतात यावर विश्वास ठेवायला हवा. शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाचा दर्जा, सेवापूर्व कार्यानुभव, स्पर्धेतून निवड, निवडलेल्यांचा निरंतर विकास, विकसिताला पदोन्नती, पदोन्नतीबरोबर वेतनवाढ व कठोर बांधीलकीचे बंधन, प्रयोग, संशोधन आणि उपक्रमांची स्वायत्तता, अभ्यासक्रम निर्मिती, बदल आणि सुधारणेचे स्वातंत्र्य, आकर्षक वेतनमान, सेवाशर्ती व निवृत्ती, उपादान योजना या सर्व प्रक्रियांतून उत्कृष्ट शिक्षक घडणीचे ध्येय साध्य होत असते, याचे भान ठेवून जर आपण प्रयत्नशील राहिलो तर नक्कीच आपणास यश येऊ शकेल. तसे जगभर झालेले प्रयत्नही आपण समजून घेतले पाहिजेत.

एकविसाव्या शतकातील शिक्षण/२१