पान:एकविसाव्या शतकातील शिक्षण (Eakavisavya shatakatil shikshan).pdf/21

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ऊर्मी राहणार तर कशी? उत्कृष्ट शिक्षक घडणीची यंत्रणेत तरी सोय राहिलेली नाही. नैतिकता, प्रामाणिकपणा, ध्येयवाद, समर्पण, सेवा, त्याग इत्यादी जीवन व व्यक्तिमूल्यांना हरताळ फासला गेल्याने आपणाकडे उत्कृष्ट शिक्षकांच्या घडणीचा प्रश्न बिकट झाला आहे.
 शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाइतकाच गंभीर प्रश्न शिक्षक नियुक्तीचाही आहे. शिक्षक नियुक्तीत शासनाने, आपल्या धोरणातूनच 'चातुर्वर्ण्य' निर्माण केला आहे. अंगणवाडी ते विद्यापीठ सर्व स्तरांवर तासिका तत्त्वावरील शिक्षक, हंगामी, शिक्षण सेवक, कायम शिक्षक आज भारतभर अस्तित्वात आहेत. शिक्षण व्यवस्थेत असलेले वैविध्य व विषमता ही आपल्या शिक्षणाचा अंतर्भाव घटनेनुसार समवर्ती सूचीत (Cuncurrent List) असणे हे एक कारण आहे. भारत हा अठरापगड जातींचा. भाषिक, सांस्कृतिक, भौगोलिक विभिन्नतेने नटलेला देश असणे हे त्याचे कारण सांगितले जात असले तरी एकात्म भारत घडविण्यासाठी या देशास राष्ट्रीय शिक्षण, भाषा, अभ्यासक्रम, प्रशिक्षण, संशोधनविषयक धोरणाची गरज आहे.

 शिक्षकांची अर्हता (पात्रता), सेवाशर्ती, पदोन्नती, पगारवाढ इत्यादींचे निकष, धोरण व पद्धती या गोष्टीही उत्कृष्ट शिक्षकघडणीतील अडथळे होत. शिक्षकांची नियुक्ती औपचारिक पात्रता धारण केल्यावर होते. नियुक्तीच्या वेळी शिक्षकवृत्ती, प्रयोगशीलता, संशोधन, लेखन, प्रकाशन, वक्तृत्व, समाजकार्य, प्रश्नभान इत्यादी गोष्टींचा औपचारिक पात्रतेसह विचार होऊन शिक्षकवृत्ती प्राधान्याकडे नियुक्तीचे होकायंत्र वळायला हवे. सेवापूर्व प्रशिक्षण अधिक परिणामकारकपणे राबवायला हवे. जगात शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रमांचे निकाल आपल्यासारखे १००टक्के नसतात. मी बी. ए., बी. एड. समन्वित अभ्यासक्रम राबविणाच्या महाविद्यालयाचा प्राचार्य होतो. एका विद्यार्थ्याने प्रात्यक्षिक पूर्ण केले नसल्याने तो नापास झाल्यावर मोठा गहजब झाला होता. प्रात्यक्षिक कार्यात कुणाला नापास केले जाते का? असे प्रश्न मलाच केल्याचे आठवते. अशा स्थितीत जोवर आपण बदल घडवून आणणार नाही, तोवर उत्कृष्ट शिक्षकाची घडण केवळ स्वप्नरंजनच नाही का ठरणार? बहुसंख्य शिक्षक नियुक्तीच्या वेळी जी किमान शैक्षणिक पात्रता धारण करून येतात, निवृत्तीच्या वेळीही त्यांची पात्रता तीच राहते. निरंतर शिक्षणाचे धोरण राबवून पात्रता विकास व वाढीचा आजचा संबंध केवळ पगारवाढीशी ठेवला आहे. तो पदोन्नतीस जोडला पाहिजे. व्यवसायात पदोन्नतीच्या संधी ज्या प्रमाणात महाविद्यालये, विद्यापीठात आहेत तशा त्या प्राथमिक, माध्यमिक व

एकविसाव्या शतकातील शिक्षण/२०