पान:एकविसाव्या शतकातील शिक्षण (Eakavisavya shatakatil shikshan).pdf/20

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शिक्षक घडण : जग आणि आपण

 ‘शिक्षकांची घडण' हा केवळ भारतातच नाही तर जगाच्या ऐरणीवर आलेला प्रश्न आहे. आपणाकडे शिक्षणाच्या धोरणात सातत्य नसल्याने मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत. स्वातंत्र्याच्या ७० वर्षांच्या प्रवासात आपण अनेक शिक्षण आयोग, कायदे, धोरणे, श्वेतपत्रिका इत्यादी जाहीर करून त्यांची अंमलबजावणी केली असली तरी परिणाम हाती न येण्याची जी कारणे आहेत त्यांत अपुरी आर्थिक तरतूद, कार्यक्षम अंमलबजावणीचा अभाव, राजकीय इच्छाशक्ती नसणे, सवंग शैक्षणिक निर्णय व धोरणं यांचा अंतर्भाव करावा लागेल. आज आपणाकडे उत्कृष्ट शिक्षक घडविण्यासाठी लागणारे स्वतंत्र शिक्षक प्रशिक्षण धोरण नाही. शैक्षणिक धोरणातील ते एक अंग आहे. राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट शिक्षक घडणीचा विचार करणारी संस्था आहे. राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद (National Council for Teacher Education) तिचे नाव. भोपाळमध्ये तिचे मुख्यालय आहे. पैसे देऊन ती शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालयांना परवानगी देते म्हणून ती बदनाम झाल्याने तिचे अस्तित्व ठप्प आहे. तीच स्थिती वैद्यकीय शिक्षण संस्थांना मान्यता देणाच्या राष्ट्रीय परिषदेची. अध्यापक प्रशिक्षणाकडे आपण फार गंभीरपणे पाहत नसल्याने शिक्षक घडणच धोक्यात आहे. डी. एड., बी. एड., एम. एड्. अभ्यासक्रम शिकविणारी प्रशिक्षण महाविद्यालये सर्रास विनाअनुदान तत्त्वावर निर्माण होत असल्याने त्यांना किमान सुविधा पुरविता येत नाहीत. वेतनमान दिले जात नाही. फक्त पदवी वितरणाचा कार्यक्रम सुरू असल्याने मागणी व पुरवठा सिद्धान्ता धाब्यावर बसविला गेल्याने प्रशिक्षणाला वारेमाप देणगी द्यायची, नियुक्तीवेळी संस्थाचालकांचे हात ओले करायचे - शिक्षकात शिकविण्याची ऊर्जा आणि

एकविसाव्या शतकातील शिक्षण/१९