पान:एकविसाव्या शतकातील शिक्षण (Eakavisavya shatakatil shikshan).pdf/166

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

इंग्रजी झाली. प्रादेशिक वा मातृभाषेत शिक्षण घेणारे विद्यार्थी उच्च शिक्षणात कच्चे राहतात, त्या जाणिवेने पालकांनी शाळांमध्ये इंग्रजी, अर्धइंग्रजी (Semi English) चा आग्रह धरण्यातून माध्यमिक शाळांत इंग्रजीत शिकविणे पसंत केले जाऊ लागले. हे धेडगुजरी अध्यापन होते, हे लक्षात आल्यावर बालवाडीपासूनच इंग्रजी माध्यमाचे शिक्षण अपेक्षिणारा पालकवर्ग तयार झाला. यातून इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे पेव भारतभर फुटले.
 पण यामागे जागतिकीकरणाचे भान पालकांना होणे, हे महत्त्वाचे कारण होते. दरम्यानच्या काळात इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून मान्यता पावली होती. संगणकक्रांतीने इंग्रजीचे महत्त्व अधोरेखित केल्याने चीन, जपान, फ्रान्स, जर्मनीसारखे भाषिक कट्टर देशही इंग्रजी माध्यमाचे शिक्षण पुरस्कृत करू लागले. बौद्धिक संपदेची भाषा इंग्रजी बनली. आंतरराष्ट्रीय देवाण-घेवाण, इंटरनेटची भाषा इंग्रजी बनली. पर्यटनात - विशेषतः विदेशी पर्यटनात - जागतिकीकरणाने वाढ झाली. त्यातून इंग्रजीच्या सार्वत्रिकीकरणाचे भान सर्वसामान्यांस झाले; पण सर्वांत मोठी अनुभूती दिली ती मोबाईलने. या साधनाने खरे तर जागतिकीकरण सर्वदूर पोहोचविले.
 एकेकाळी शाळा-महाविद्यालयांत इंग्रजी हे अनुवाद पद्धतीने शिकविले जायचे. आज प्रथम भाषा व प्रत्यक्ष पद्धती, संरचना पद्धती (Structural method) ने शिकविले जाते. शिवाय संवादी कौशल्यावर भर दिल्याने सर्वसामान्य विद्याथ्र्यांतील इंग्रजीचा न्यूनगंड कमी झाला. जागतिकीकरणाने सर्व भाषांचे इंग्रजीकरण करण्याचा झपाटा लावल्याने दैनंदिन भाषा-व्यवहारांत इंग्रजीचे वाढते आक्रमण प्रादेशिक भाषा प्रदूषित करीत आहे. नवी पिढी घरी मातृभाषा बोलते, टीव्हीवर हिंदी कार्यक्रम पाहते, शाळेत इंग्रजी शिकते; त्यामुळे ती त्रैभाषिक झाली आहे. तिला एकही भाषा धड येत नाही. 'मी डायनासोर पाहून डरलो' अशी वाक्ये सर्रास ऐकायला येणे, हे त्याचेच प्रतीक होय. वृत्तपत्रांनी तर भाषा प्रदूषणाचा विडाच उचलल्याची स्थिती आहे. त्यात इलेक्ट्रॉनिक माध्यमे (टीव्ही आणि इंटरनेट (गुगल) मागे नाही. मोबाईलची भाषिक अॅप्स सदोष आहेत. 'दुस-याला' शब्द 'दुस-याला' लिहिणे भाग पडते. वर्तमानपत्रांचे सदोष मथळे उच्च शिक्षणाची फी दामदुप्पट' यात फी

आणि दाम दोन्हींचा अर्थ एकच आहे, ते संपादकांच्याही लक्षात येत नाही; त्यामुळे जागतिकीकरणात इंग्रजीचा आग्रप सावध हवा. भाषिक प्रयोग जबाबदार हवेत. शिवाय स्थानिक भाषा, बोली, संस्कृती टिकली नाही तर उद्याची पिढी ‘धोबी का कुत्ता, ना घर का, ना घाट का' अशी त्रिशंकू झाल्याशिवाय राहणार नाही.

एकविसाव्या शतकातील शिक्षण/१६५