पान:एकविसाव्या शतकातील शिक्षण (Eakavisavya shatakatil shikshan).pdf/162

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जागतिकीकरणाचे शिक्षणावरील परिणाम


 जागतिकीकरण म्हणजे जगाचे एकात्म होणे होय. गेल्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत जग विभागलेले होते, ते खंडनिहाय होते, तशीच राष्ट्रांची ओळख मुख्य असायची. युरोप, आशिया, अमेरिका, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया या पंचखंडांची स्वतःची ओळख होती व वैशिष्ट्येही भिन्न होती. तीच गोष्ट देशांची. प्रत्येक देशाचं स्वतःचं व्यक्तिमत्त्व होतं. माणूस स्थलांतरित झाला, तो व्यापार व प्रवास करू लागला; तसे खरे तर जग एकमेकांच्या संपर्कात आले. पर्यटनातून साहसी खलाशांनी नवनवे प्रदेश-देश शोधले. पंधराव्या शतकात व्यापारार्थ विकसित रेशीम मार्ग असल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. एकोणिसाव्या शतकात वाफेच्या इंजिनाचा शोध ही जग जवळ आणणारी घटना ठरली. वाफेच्या इंजिनामुळे जहाज व आगगाडी गतीने पळू लागली आणि कमी वेळात मोठे अंतर कापणे शक्य झाले. विसाव्या शतकात तार व टेलिफोनने जागतिक संपर्क सुकर केला. मोटार, दुचाकीच्या शोधाने माणसाचे चलनवलन गतिमान केले. विसाव्या शतकाचा उत्तरार्ध संपर्कक्रांतीचा मानला जातो. संगणक, मोबाईल, इंटरनेटमुळे काळ-काम-वेगाचे गणित संपुष्टात आले. माणूस जिथे आहे तिथेच जग येऊन ठेपलं. अंतर, गती, वेळ इत्यादींसंबंधी पूर्वकल्पनांना मिळालेला विराम हे संपर्कक्रांतीचे खरे यश. जगाचे सपाटीकरण यातून आले. म्हणजे जगाची भाषा, पोशाख, अन्न, चलन, कार्यसंस्कृती एक होणं म्हणजे जागतिकीकरण. आंतरराष्ट्रीय व्यापार, आर्थिक गुंतवणूक, तंत्रज्ञान, पर्यावरण, विकास, संस्कृतीच्या एक होण्यातून ते आकाराला

आलं.

एकविसाव्या शतकातील शिक्षण/१६१