पान:एकविसाव्या शतकातील शिक्षण (Eakavisavya shatakatil shikshan).pdf/148

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शिक्षणातूनच धर्मनिरपेक्ष भारत घडेल

 मा. कुलगुरू, डॉ. श्री. व सौ. लाभसेटवार, उपस्थित प्राध्यापक व विद्यार्थी बंधू-भगिनींनो
 आज भारत हा कधी नव्हता इतका प्रतिकूल परिस्थितीतून जात आहे. कोणताही देश दोन प्रकारे संकटात येत असतो - (१) आंतरिक, (२) बाह्य. आज आपण दुहेरी संकटांमधून जात आहोत. बाह्य संकटांपेक्षा आपले आंतरिक संकट आज मोठे आहे. त्यामुळे घटनेच्या सरनाम्यातील स्वातंत्र्य, बंधुता, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, लोकशाही ही पंचशील तत्त्वेच मूलतत्त्ववादी वेठीस धरू पाहत आहेत. त्यामुळे विशेषतः भारताची धर्मनिरपेक्षताही ओळख पेरणीवर आहे.

 परंपरेने भारत बहुवंशीय, बहुधर्मीय, बहुभाषी, बहुजातीय, बहुसांस्कृतिक देश आहे. इथे वैविध्यपूर्णतेच्या सहअस्तित्वाची परंपरा आहे. अशा पार्श्वभूमीवर जातीय वा धर्मीय अस्मिता आणि अस्तित्वाची अभिनिवेशी स्पर्धा इथल्या ‘आंतरभारती' स्वरूपावर मोठा आघात करू पाहत आहे. घटनेतील ‘समाजवादी मूल्यांवर आधारित इथला सामाजिक न्याय मूलतत्त्ववादी विचारसरणीच्या समुदायास मान्य नसल्याने कधी ते पंचशील मूल्ये रुजवू पाहणा-या व्यक्तींना गोळ्या घालून गारद करीत आपला उन्माद व्यक्त करतात तर कधी ते धर्माच्या नावावर संवेदनशील घटना, अफवा पसरवित समाजात अस्वस्थता, अशांती निर्माण करीत असतात. धर्मनिरपेक्षतेचा पायाच मुळी धर्म व शासनाची फारकत सिद्ध करतो, हे आपणास विसरता येणार नाही. धर्म-निरपेक्षतेच्या तीन कसोट्या नेहमी अधोरेखित केल्या गेल्या आहेत -

एकविसाव्या शतकातील शिक्षण/१४७