पान:एकविसाव्या शतकातील शिक्षण (Eakavisavya shatakatil shikshan).pdf/120

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शिक्षणाची बदलती क्षितिजे


आभासी ज्ञानरंजन शिक्षण
(Virtual Infoternment Education)

 सन १९९० मध्ये मी काही काळ युरोपमध्ये होतो. त्या वेळी काही दिवस लंडनमध्ये असताना तिथल्या वर्तमानपत्रांत एक बातमी प्रसिद्ध झाली होती. तेथील ब्रिटिश लायब्ररी विकासासाठी तिथल्या सरकारनं मोठे अनुदान देऊ केलं होतं. ग्रंथालय प्रशासनाने त्या अनुदानाच्या रकमेतून मोठी इमारत बांधण्याचा घाट घातला होता. हे लक्षात आल्यावर त्या ग्रंथालयाच्या वाचक संघांनी त्या इमारत प्रकल्पाला विरोध करीत अशी मागणी केली होती की, ज्ञानाच्या विस्ताराची नवी क्षितिजे पाहता अशा अनुदानातून इमारती उभ्या करण्यापेक्षा तेच पैसे ज्ञानविस्ताराच्या तंत्रज्ञानात व ज्ञानाच्या नव्या स्वरूपात गुंतवावेत. पुढे मागणीत स्पष्ट केले होते की, या पैशांतून जुने ग्रंथ, नियतकालिके, वृत्तपत्रे यांचे डिजिटायझेशन, स्कॅनिंग करणे, मुद्रित पुस्तकांबरोबरच ईबुक्स, सीडीज, कॅसेट्स, व्हिडिओ टेप्स खरेदी करणे, ग्रंथालयांचे संगणकीकरण, सेवा-सुविधा ऑनलाईन करणं, इत्यीदी नव्या तंत्रज्ञान वापरावर आणि उपकरण, साधनं खरेदी व सेवाविस्तारावर भर देण्यात यावा. हे वृत्त वाचले तेव्हा मी यातील कशाशीच परिचित नव्हतो. ‘संगणक' हा शब्द ऐकून होतो; पण त्या दौ-यात रेल्वे स्टेशन, पोस्ट ऑफिस, बँक, शाळा, इत्यादींमध्ये वरील गोष्टी वापरात असल्याचे पाहिल्या, अनुभवल्याने वरील वृत्ताने माझे डोळे उघडले होते.

एकविसाव्या शतकातील शिक्षण/११९