पान:एकविसाव्या शतकातील शिक्षण (Eakavisavya shatakatil shikshan).pdf/106

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मनुष्यबळ विकास अहवालात प्रकाशित सांख्यिकी माहितीने (युएनडीपी२००५) ते स्पष्ट केले आहे. गेल्या काही वर्षांत गरीब व श्रीमंत, विकसित व अविकसित व्यक्ती व देशांतील दरी वाढली आहे. ती वर्षानुवर्षे सतत वाढते आहे, हा खरा चिंतेचा नि चिंतनाचा विषय होऊ पाहतो आहे... हे अपयश केवळ तंत्रज्ञानाचं नाही. आपण तंत्रज्ञानाचा फायदा व्यापक जनसमुदायापर्यंत पोहोचवू शकलो नाही, हे खरे शल्य आहे. अधिकाधिक माणसांचं कल्याण व विकास हे आपले अपेक्षित लक्ष्य होतं. हे आपलं राजकीय अपयश होय. आपण लोकशाही कार्यपद्धतीचा अंगीकार केला आहे. लोकशाहीचं खरं ईप्सित अजून स्वप्न नि मृगजळच राहतंय, ही खेदाची बाब आहे.
 वर्तमान स्वप्न नि सत्यातील दरी ही माहिती, ज्ञान व बुद्धिचातुर्य यांच्यातील योग्य समन्वयाच्या अभावामुळे निर्माण झाली आहे. असे सांगितले जातं की, माहिती ही प्रत्येक तीन वर्षांनी दुप्पट होते; पण असं ज्ञानाचं होत नाही. माहिती व ज्ञानात मूलभूत फरक आहे तो हाच. माहिती हा ज्ञानाचा कच्चा माल होय. संदर्भित माहिती निवड, प्रक्रिया, एकीकरण अशा टप्प्यांतून ज्ञानात रूपांतरित होत असते. त्यासाठी प्रेरणा व स्त्रोताची, संवेदनशील जिवंत झयांची आवश्यकता असते. या दोन्ही क्षमतांचा विकास केवळ शिक्षण नि प्रशिक्षणामुळे होतो. शिक्षणाचा दर्जा जितका उंचावेल, अध्यापन जितके परिणामकारक होईल तितका ज्ञानाचा प्रचार, प्रसार व विकास होईल. विकास प्रक्रियेत कल्याणकारी भावना अंतर्भूत नसते. ती भावना ज्ञानच निर्माण करते. विकासासाठी शहाणपण आवश्यक असते. असे ज्ञान केवळ शहाणपणानंच येतं. ज्ञानाचा आधारभूत घटक म्हणजे नैतिकता. प्रेम व ज्ञानाच्या साक्षात्काराने सभ्य माणसांचे जीवनक्रम, प्राधान्यक्रम बदलल्याची अनेक उदाहरणे आहेत. आपल्या विकासाच्या धोरणाची व्याप्ती वाढवायची तर त्यासाठी नैतिकतेचा पायाभूत विकास व्हायला हवा. तसे झालं तर ज्ञानक्रांतीचा फायदा सर्वांत शेवटच्या साधनहीन माणसापर्यंत पोहोचू शकेल.

 उच्च शिक्षणासह सर्व शिक्षणस्तरांचे सार्वत्रिकीकरण हाच मानवसमाजाच्या सर्वोदयाचा एकमात्र रामबाण उपाय होय. आज ही गोष्ट सर्वमान्य झाली आहे की, १७ ते २३ वर्षे वयोगटातील तरुणांच्या शिक्षणाचे प्रमाण जोवर किमान २० टक्के होणार नाही, तोवर आपणास विकासाचा दर साध्य करता येणार नाही. विकसित देशांत वरील वयोगटातील शिक्षणाचं प्रमाण ५० टक्के आहे. भारतात हे प्रमाण अवघे ८ टक्के आहे. आपण सन २०२० पर्यंत जगातील

एकविसाव्या शतकातील शिक्षण/१०५