पान:एकविसाव्या शतकातील शिक्षण (Eakavisavya shatakatil shikshan).pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ही तिसरी क्रांती मानली जाते. यापूर्वीची पहिली शेतीविकासाची क्रांती होती, तर दुसरी उद्योगविकासाची. पहिल्या दोन क्रांत्यांच्या तुलनेने तिस-या क्रांतीची व्याप्ती ही सर्वस्पर्शी ठरली आहे. कृषिक्रांतीच्या वेळचे भांडवल होते, आपणाकडे असलेली लागवडयोग्य जमीन, उद्योगक्रांतीचा नैसर्गिक स्रोत ही शेतजमीनच होती. विद्यमान ज्ञानक्रांतीच्या निर्माणप्रक्रियेत ज्ञानाला असाधारण महत्त्व प्राप्त झाल्याचे दिसून येते. किंबहुना दुस-या शब्दांत सांगायचं झालं तर ज्ञान हाच नव्या क्रांतीचा केंद्रीय विषय वा गाभा-घटक होय. ज्ञानक्रांतीत शेतजमीन, नैसर्गिक साधनसंपत्ती नि आर्थिक भांडवलाची जागा ज्ञानाने घेतली आहे. ज्ञानच नव्या युगांचं भाडवलं आहे. ते विकासाचे सशक्त साधन म्हणून आता सर्वमान्यही झालं आहे.
 आर्थिक भांडवलासारख्या पारंपरिक निर्णायक विकास घटकांची जागा आता ज्ञानासारख्या अभौतिक घटकाला मिळाल्याने हे स्पष्ट झालं आहे की, भविष्यातील विकास हा ज्ञानाच्या संपादन, निर्मिती व प्रसारावर अवलंबून असेल. कृषिक्रांती होण्यास हजारो वर्षे लागली. औद्योगिक क्रांती होण्यास शतकाचा काळ लोटावा लागला. या उलट ज्ञानक्रांती अवघ्या दशकात झाली, यावरून या क्रांतीची गती लक्षात येते. भौतिक साधनसंपत्ती आणि ज्ञानाच्या स्वरूपात वैज्ञानिक अंतर आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवे. भौतिक साधनसंपत्ती वापरली जाते तेव्हा ती नाश पावते. ज्ञानाचे या उलट आहे. ज्ञानसंपदा वापरू तितकी वाढते. भौतिक साधनसंग्रह व दळणवळणास प्रचंड खर्च लागतो. या उलट ज्ञानसाधनाचे दळणवळण गतिशील असते. त्यांच्या संग्रह व दळणवळणास येणारा खर्च मोबदल्याच्या तुलनेने पाहिला तर नगण्य असतो. या मूलभूत फरकामुळे भौतिक साधन व ज्ञानसाधनांच्या विकासातील केवळ काळाचे अंतरच संपुष्टात आले असे नसून त्याने विकासाचा लाभ वैश्विक नि सार्वत्रिक करण्याचे ऐतिहासिक कार्य केले आहे. पूर्वीच्या तुलनेने नवक्रांतीचा लाभ म्हणजे ज्ञानाचा फायदा हा व्यापक महाजालामुळे केवळ व्यक्ती नि घर अशा मर्यादित स्वरूपात न राहता तो जागतिक प्रभाव करणारा सिद्ध झाला आहे. त्यामुळे विकसित व अविकसित देशांतील साधनहीन वर्गापर्यंत विकासाचा लाभ पोहोचणे शक्य झाले. तद्वतच गरीब व श्रीमंत, साधनसंपन्न व साधनहीन यांतील अंतर संपुष्टात येण्यास मोठे साहाय्य झालं आहे.

 असे असले तरी दुर्दैवाने आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ समाजातील साधनहीन वर्गापर्यंत पोहोचण्याची अपेक्षा फोल ठरली, हे सत्य आहे. सन २००५ च्या

एकविसाव्या शतकातील शिक्षण/१०४