पान:एकविसाव्या शतकातील शिक्षण (Eakavisavya shatakatil shikshan).pdf/100

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ही उद्दिष्टे निर्धारित करीत असताना निरंतर शिक्षणाची (Learning throughout the life.) कल्पना पायाभूत मानण्यात आली आहे. समजून घ्यायला शिकत असताना सामान्यज्ञान महत्त्वाचं मानावे. विषयांची संख्या कमी असावी. शिक्षण क्रियात्मक राहावे. ते अनुभव समृद्ध करणारं असावं, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. क्रियात्मक शिक्षणाचे उद्दिष्ट केवळ कौशल्य संपादनाचे असता कामा नये; तर विभिन्न परिस्थितीत विद्यार्थ्यास त्याच्या वापराचे ज्ञान असलं पाहिजे, यावर भर देण्यात आला आहे. केवळ डाव्या अस्तनीचे शिंपी होण्याचा काळ आता संपला आहे. देशातील तरुणांची घडण स्थानिक, राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय महत्त्वाच्या सामाजिक कार्यानुभवावर, औपचारिक व अनौपचारिक अशा दोन्ही मार्गांनी करण्यावर भर द्यावा, असे सुचविण्यात आलं आहे. एकविसाव्या शतकाचे सर्वांत मोठे आव्हान सामंजस्यपूर्ण सहअस्तित्व राहणार असून, त्या दिशेने शिक्षणाची रचना करण्यावर जोर देण्यात आला आहे. संघर्ष टाळून जगण्यास शिकविण्याची मोठी गरज लक्षात घेऊन विद्याथ्र्यांत परस्परसामंजस्य वाढविण्याकडे लक्ष केंद्रित करण्याची अपेक्षा आहे. वर्तमान शिक्षणपद्धती व व्यवस्थेमुळे शिक्षणप्रसाराच्या गतीबरोबर रोजगार संधी वाढायला हव्या होत्या. तसे न झाल्याने सुशिक्षित बेरोजगार तरुण शिक्षणाबद्दल कमालीचे उदासीन व निराश बनले आहेत. ही अनास्था दूर होण्यासाठी नियोजन व तरतूद अशा पातळ्यांवर एकाच वेळी पण समांतरपणे प्रयत्न करण्याबद्दल अहवाल सुचवितो. अशीच गोष्ट समांतर शिक्षण संस्थांबाबत. शासकीय व अनुदानित, मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थांबरोबर स्वायत्त व बहुउद्देशीय शिक्षण व्यवस्था सुरू करण्याची आवश्यकता अहवालात स्पष्ट करण्यात आली आहे. त्यासाठी दीर्घकालीन धोरण व कार्यक्षम अंमलबजावणीबाबतची दक्षता घेणे जरुरीचे आहे.

 जगातील एकही प्रतिभा संधीअभावी सुप्त राहता कामा नये, या उद्दिष्टाने तयार करण्यात आलेला हा अहवाल प्रत्येकाच्या अंतर्विकासाचा ध्यास स्पष्ट करताना दिसून येतो. आदर्श समाजरचना हे अहवालाचं ध्येय आहे. हा अहवाल केवळ शैक्षणिक सुधारणा सुचविणारा नसून शिक्षणाबद्दलचा एक नवा दृष्टिकोन रुजवू पाहतो आहे. शिक्षणाबद्दलचे आपले धोरण आगामी शतकात अधिक उदार, तद्वतच लवचिक असावे, असे अहवालकत्र्यांचं म्हणणे आहे. नव्या शिक्षणात आधुनिक तंत्रज्ञानाने विकसित केलेली सर्व प्रकारची साधनं व स्त्रोतांच्या अधिकाधिक वापराने शिक्षण परिणामकारी बनू

एकविसाव्या शतकातील शिक्षण/९९