पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/8

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

(५) मूलग्रंथात संस्कृत भाषा आणि बालभाषा अशा दोन प्रकारच्या भाषा आहेत, परंतु ह्या भाषांतरांत एक मराठी भाषा मात्र आहे. कोठे कोठे हवेतेतसे मराठी शब्द न सुचल्यामुळे निरुपाय होऊन संस्कृत भाषेतले शब्द घेतले आहेत, तथापि त्यांचा अर्थ समजण्यास त्या त्या पृष्ठाचे खालच्या आंगास टिपा घातल्या आहेत. हा ग्रंथ बहुतकरुन परस्पर संभाषणरूप आहे. ह्यांत आरंभी बोलणाराचे नांव लिहून पुढे त्याचे बोलणे लिहिले आहे. ज्या ठिकाणी दोहींकड़े ( ) अशा खुणा करुन जें त्यांच्या मध्ये वाक्य लिहिले आहे त्या ठिकाणी तें वाक्य अर्थ संगतीकरितां कवीचे आहे असे समजावें. नाटक ग्रंथ जे केणी वाचावयास घेतो त्याने इतिहास किंवा बखर इत्यादि ग्रंथाप्रमाणे साधे रीतीनें एक सारखे वाचूं नये. परस्पर भाषणाची लोकरीति मनांत आणून उच्च,नीच कोमल कठोर अशा स्वरभेदानें वाचावें, ह्यणजे वाचणा-यांच्या व ऐकणा-यांच्या मनात रसाविर्भाव होतो. ह्या नाटकांत करुणरस आणि शृंगाररस हे प्रधान आहेत. शृंगार आहे तो विप्रलंभ शृंगार,म्हणजे वियोग काळीचा शृंगार वर्णिला आहे. हें भाषांतर यथामतेि केले आहे. ह्या ग्रंथांत चुक्या अर्थाविषयी आणि शब्दाविषयी पृष्कळ असतील, परंतु त्यांजकडे दृष्टि न देतां गृणलेशाकडे दृष्टि देऊन उणे असेल तें पूर्ण करणे आणि ग्रंथास मान देणे हे विद्वानांस भूषण आहे.