पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/7

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

(४ ) असावी तशी नाहीं ह्यामुळे, संस्कृतांतल्या प्रमाणे रसपरिपाक उतरणार नाहीं हे ही उघडच आहे. मूळ संस्कृतग्रंथाचे हे भाषांतर असे म्हटले, परंतु केवळ शब्दास शब्द अशा रीतीने केले असे नाही. क्वचितस्थळी न्यूनाधिक्य केले आहे. मूळग्रंथ गद्यपद्यात्मक आहे. त्याप्रमाणे ह्यांत ही गद्यांचे ठिकाणीं गद्ये आणि पद्यांचे ठिकाणीं पद्ये केली आहेत. श्लोकांची वृत्ते मूळग्रंथाप्रमाणेच सर्व आहेत असे नाही. ज्या ठिकाणी जसें साधलें त्या ठिकाणी तसे केले आहे. कितीएक ठिकाणीं आर्या आहेत. कितीएक ठिकाणी साक्या,दिंड्या,ओव्या,पदे अशी ही प्राकृत कवितेच्या चालीप्रमाणे पद्ये केली आहेत. ह्या ग्रंथास उत्तररामचरित्र हें नांव ठेवण्याचे कारण हेंच की, भगवान् रामचंद अयोध्यापुरींत सिंहासनारुढ झाल्यावर जें चरित्र झालें तें ह्या ग्रंथांत बांधले आहे. मूळग्रंथाचे सात अंक ह्मणजे भाग आहेत, त्याप्रमाणे येथे सात अंक केले आहेत. पहिल्या अंकांत लोकापवादामुळे रामानें सीनेचा त्याग केला आहे; दुसच्या अंकांत शंबुकवधाच्या निमितानें रामचंद पंचवटीस गेला आहे; तिसच्या अंकांत सीतेच्या विरहार्ने रामास फार शोक झाला आहे; चवथ्या अंकांत वाल्मीकिमुनीच्या आश्रमास कौसल्या, जनक, वसिष्ठ हे गेले आहेत पांचव्या अंकांत चंद्रकेतु आणि लव,कुश ह्यांचा युद्ध प्रसंग झाला आहे; सहाव्या अंकांत रामाची आणि लव,कुश ह्यांची भेट झाली आहे; आणि सातव्या अंकांत सर्वांच्या भेटी होऊन वाल्मीकिमुनीनें रामाची आणि सीतेची भेट करुन दिली आहे.