पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



इस्लामी संस्कृतीचे क्रांतिकार्य

वैषम्यास प्रामुख्य दिले होते. ख्रिस्ताचा धर्म मात्र या दोषांपासून अलिप्त होता. परंतु त्यांतील धर्मतत्त्वांचा सूक्ष्म शास्त्रार्थ त्रिमूर्तिवादाच्या, व सिद्धांतभेदांच्या घोटाळ्यांत सांपडला होता. युरोपांतील ख्रिस्तपूर्व समाजांतील अडाणी धर्मकृत्यांचा गळाठा नष्ट न करता तसाच उरावर घेतल्यामुळें ख्रिश्चन धर्म डबघाईस आला होता. हे तिन्ही धर्म अरबांना व पश्चिम व मध्य आशियातील मोठ्या मानवसमाजांना वश करू शकले नाहीत, कारण त्या धर्मात प्रभातकालांतील उत्साहदायी वातावरण राहिलें नव्हतें. त्यांना संध्याकाळचा थकवा आला होता. अरबांचा पूर्वीचा धर्म मूतपूजेचा होता. त्यांच्यांत तीनशे- पेक्षा अधिक दगडाचे देव होते. इस्लाममध्ये एकांतिक एकेश्वर भक्तीचे तत्त्व आलें. या एकेश्वर भक्तीनें दगडी देवांच्या भारापासून अरबांचें मन मुक्त करून सगळ्या भांडखोर अरबांना एकजीव केलें. संशय, विश्वासघात व असह्य उच्चनीच भेद यांचा बुजबुजाट असलेल्या जगांतून विश्वास, सहकार्य व शौर्य यांच्या नव्या जगांत अरबांनीं व अनेक जुन्या मानवसमाजांनी इस्लामच्या आश्रयाने प्रवेश केला. इस्लाममधील ऐहिक जीवनाचा आस्वाद कुशलतेनें घेण्यास लावणा-या सकाम कर्मयोगामुळे मुसलमानांनीं नवें साम्राज्य निर्माण केलें. ऐहिक जीवनाबद्दलची विरक्ति व संन्यास यांचा वासही इस्लाममध्ये नाहीं. आधुनिक विज्ञानाच्या जन्माचीं शुभसूचक मंगल लक्षणें अरबांच्या साम्राज्यांत प्रथमतः दिसलीं. या साम्राज्यानें जुन्या रोमन साम्राज्याचा अंत पाहिला व आर्यन इराणी साम्राज्याच्या तडाख्यांतून सेमेटिक राष्ट्रांस मुक्त केलें. अरबांचें साम्राज्य सिंधु नदीपासून तों इंग्लिश खाडीपर्यंत पसरलें. रोमन साम्राज्याचा कायदा व राज्यव्यवस्था, ग्रीकांचें तत्त्वज्ञान, भूमिति, भौतिक विद्या, तर्कशास्त्र व ललितकला, हिंदुस्थानचे वैद्यक, गणित व वाङमय आणि चीनच्या औद्योगिक कला अरबांनीं संपादन केल्या. सगळ्या ज्ञात जगाच्या संस्कृतींचें संगमस्थान अरबी साम्राज्य झालें. या