Jump to content

पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महंमद व त्याचे तत्त्वज्ञान असत. कित्येक क्रांतिकारक विचारवंतांनीं बुद्धीच्या वेदीवर श्रद्धा आणि धर्म यांचा होमच केला. बगदाद, कैरो, कोरोडोव्ह येथे ज्यांची सत्ता होती अशा धर्मसंरक्षकांनीही अंतःस्फूर्तीपेक्षां प्रत्यक्ष ज्ञानाचीच महती वाढविली. बोखाराच्या स्वतंत्र साम्राज्यांतही पुरोहितांपेक्षा कवींचा, शहाण्यांचा मान अधिक, धर्मविचारांच्या धन्वंतरीपेक्षां हकीम वगैरेंचेच स्थान महान् होते आणि धर्मप्रचारापेक्षा शास्त्रीय शोधांनाच अधिक महत्त्व मिळत असे. इस्लामच्या विजयाने निर्माण झालेल्या केवळ, सामाजिक परिस्थितींतच या बौद्धिक विकासाची बीजे नव्हती. महंमदाच्या धर्मसिद्धांतांतुनही याची उपपत्ति लागते. कुराणांतील कांहीं मजेच्या गोष्टी अगर त्याचा साधेपणा पाहून इस्लामच्या ऐतिहासिक कार्याची किंमत कमी मानण्याचे कारण नाहीं.