ग्रीस, रोम, इराण व चीन यांचीच नव्हे तर हिंदुस्थानची पुरातन संस्कृतिही अधोगतीच्या मार्गाला लागली होती. त्यामुळें सर्व बहुजन समाज अगतिक व अवश झाला होता. त्या स्थितीतून त्याला वर काढण्यासाठीं क्रांति घडवून आणण्याचें यशस्वी कार्य इस्लामी धर्मानें केलें आहे;आणि त्यामुळेंच इस्लामी धर्माचा प्रभाव व यश आश्चर्यावह ठरले आहे.
देव-धर्म रक्षणासाठीं परजलेली महंमदी तरवार निव्वळ देव-धर्म रक्षण करूनच थांबली नाहीं. तिनें नव्या समाजशक्तीला विजयश्री मिळवून दिली. या विजयानें वौद्धिक नवचैतन्य निर्माण केलें व त्याच चैतन्यांत सर्व धर्मश्रद्धेयांचें निर्मूलन झालें.
महंमदानें इस्लामचें तत्त्व शोधून काढलें नाहीं किंवा त्याचा त्याला साक्षात्कारही झाला नाहीं. अरबी राष्ट्राला मिळालेला तो इतिहासाचा वारसा होता. मात्र त्या संपत्तीचें मोल ओळखून तिचें दान देशबांधवाना करणें, यांतच महंमदाचें माहात्म्य आहे.
–एम. एन. रॉय