पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उपोद्घात गॉथच्या मिठीतून मुक्त केला. अलेक्झेंड्रिया व सीरिया यांच्या बंदरांत बनविलेली त्यांची आरमारें भूमध्य समुद्रांत डौलाने डुलत असत. ग्रीक बेटांना त्यांनी सळो की पळो केले आणि बायझंटाइन् साम्राज्याच्या आरमारी सत्तेला त्यांनीच आव्हान दिले. त्यांना हे सर्व विजय लीलेने लाभले. पशयन व अॅटल्स पर्वतांवरील बर्बरांना याच लोकांनी काय तो प्रतिकार केला. त्यांच्या या विजयपरंपरेला कोठेच प्रतिबंध येणार नाहीं असेच आठव्या शतकाच्या आरंभी वाटलें. भूमध्य समुद्रावरची रोमन लोकांची सत्ता नामशेष झालीनाममात्रही राहिली नाहीं. नवीन पौर्वात्य धर्मावर अधिष्ठित अशा नव्या संस्कृतीशी दोन हात करण्याचा प्रसंग आपणावर आला आहे असेच सर्व ख्रिस्ती राष्ट्रांना वाटले. -एच्. ए. एल्. फिशर : यूरोपचा इतिहास १३७-३८. हें भयंकर आश्चर्य घडले तरी कसे हा प्रश्न इतिहासकारांना घोंटाळ्यांत पाडणारा आहे. शांत व सहनशील लोकांवर धर्मवेड्यांनी (?) मिळविलेला विजय म्हणजेच अरबांचा इतिहास हा सिद्धांत चिकित्सक सुशिक्षितांनीं आतां त्याज्य ठरविला आहे. या चकित करणाच्या विजयाचे मर्म इस्लामी धर्माच्या क्रांतिकारकतेंत आहे. ग्रीस, रोम, इराण, चीन व हिंदुस्थान येथील संस्कृती अवनतीच्या मार्गास लागल्या होत्या. त्यामुळे तेथील बहुजन समाज अगतिक व निराश झाले होते. या अगतिकतेतून उद्धार करून त्याला क्रांतिकारक बनविण्याचे सामर्थ्य इस्लामी संस्कृतींतच होते. ३७