पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाई मानवेंद्रनाथ रॉय पुढा-यामध्ये अधिक मोठी आहे. त्यांच्या लेखणीचे सामर्थ्य फारच मोठे आहे. राजकीय मतप्रचाराचे लिखाण सोडून दिले तरी तात्त्विक व विद्वत्तापूर्ण अशी त्यांची लेखणी कोणाही बुद्धिवादी माणसास मोहिनी पाडल्याशिवाय राहणार नाहीं. स्वच्छ व स्पष्ट विचारसरणी, खोल दृष्टि आणि प्रवाही भाषाशैली यामुळे त्यांच्या खाजगी पत्रापासून तो एकाद्या मोठ्या ग्रंथापर्यंत सर्व लिखाण अत्यंत तेजस्वी व आकर्षक झाले आहे. द्रष्ट्याप्रमाणे पुढील गोष्टींचा अचूक अंदाज आणि सूत्रकाराप्रमाणे अत्यंत थोड्या शब्दांत आपला गंभीर आशय मांडण्याची त्यांची शास्त्रीय पद्धति पाहून अनेक शास्त्रज्ञांना त्यांच्याबद्दल नितांत आदरच वाटत आहे. त्यांची दृष्टीही सर्व विषयगामी अशीच आहे. याचे एकच उदाहरण हवे असेल तर त्यांनी प्रो. आईन्स्टाईनच्या Relativity च्या सिद्धांताचे मंडनार्थ लिहिलेले लेख हे आहे. त्यांतही त्यांच्या भाषेचें, तात्त्विक सूक्ष्मतेचे व स्वच्छ विचारसरणीचे प्रतिबिंब पडले आहे. त्यांच्या अगाध विद्वत्तेमुळेच आइन्स्टाईनसारखे जगप्रसिद्ध विद्वान् त्यांचे मित्र झाले. हिंदुस्थानांत सुरू असलेल्या राजकीय खळबळीच्या पाठीशीं विचारक्रांतीची अतिशय गरज आहे. विचारक्रांतीचे पुढारीपण रॉयसारखे क्रांतिमय जीवन अनुभवलेले, प्राचीन व आधुनिक वैज्ञानिक विचारांचा खोल अभ्यास केलेले व आपल्या त्यागी जीवनामुळे साधुत्वाचा आदर्श बनलेले पुरुषच घेऊ शकतील.