Jump to content

पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

इस्लामी संस्कृतीचे क्रांतिकार्य ५।६ देशांतील दलित जनतेच्या युद्धांत सक्रिय भाग घेऊन 'उदारचरितानां तु वसुधैव कुटुम्बकम्' या उक्तीची त्यांनी प्रचीति दाखविली. किंबहुना हिंदुस्थानांतून बाहेर जाऊन अन्यत्र क्रांतीचे प्रत्यक्ष विराट कार्य करणारे हे एकमेवाद्वितीय भारतपुत्र आहेत यात शंका नाहीं; आणि इतके असूनही स्वतःच्या चरित्राचा सुगावाही ते इतरांना लागू देत नाहींत इतके ते विनयी आहेत. त्यांचे बुद्धिवैभव भारतमातेस अभिमान वाटावा इतके मोठे असून ते आपली लेखणी व कर्तृत्वाची बंदूक तिच्यासाठीच अखंड व अप्रतिहत कौशल्याने चालवीत आहेत.। | त्यांचा जन्म सन १८९३ सालीं मिदनापूर येथे झाला. त्यांचे मूळचे नांव नरेंद्र भट्टाचार्य असे होते. सध्यांचे राष्ट्रपति सुभाषचंद्र बोस यांचाही जन्म याच गांवीं झाला हे ध्यानात ठेवण्याजोगे आहे. कदाचित् क्रांतिवीरांचा जन्म व्हावा असाच कांहीं विशेष गुण मिदनापूरच्या भूमीत असावा असे दिसते. भाई रॉय यांचा जन्म कांहीं मोठ्या श्रीमंत घराण्यांत झाला नव्हता. त्यांचे वडील सामान्यतः मध्यम वर्गीय गृहस्थच होते. ते शिक्षक असून बुद्धिवादी व सुधारक होते. रॉय यांचे शिक्षण त्यांचेच देखरेखीखाली थोडेसे झाले. त्यांच्या वडिलांकडून रॉय यांना बुद्धिवाद व सुधारणा यांचे बाळकडू मिळाले होते. एकदां लहानपणी त्यांनी इतरांनी देवी म्हणून मानलेल्या मडक्यास नवा बूट घालून लाथ मारली. दुसरे दिवशीं पायाला बूट लागल्यामुळे पाय दुखू लागला. त्या वेळी शेजारी म्हणाले, “तू देवाला मारलेंस म्हणून तुझ्या पायाला ही जखम झाली. तुला त्यानेच शिक्षा केली. परंतु हा युक्तिवाद चुकीचा असून बूट नवा असल्यामुळेच आपल्या पायास जखम झाली असे त्यांनी पाहिले व आपला बुद्धिवादावरील विश्वास अढळ व अचल असल्याचे एवढ्या बालवयांतही त्यांनी सांगितले. वयाच्या १४ व्या वर्षी म्हणजे सन १९०७ सालींच त्यांनी दहशतवादी क्रांतिकारक लोकांमध्ये स्वतःचा शिरकाव करून घेतला. २४