प्रकृति बिघडली होती. कानाचें दुखणें इतकें वाढलें होतें कीं ऑपरेशनशिवाय गत्यंतर नव्हतें. तिस-या वर्गाचें तिकीट काढून रॉय यांस अलिनला रवाना केलें. जवळ पैसा नसल्यामुळें एका मोफत दवाखान्यांत अगदीं सामान्य डॉक्टराकडून कानावर शस्त्रक्रिया करून घ्यावी लागली. त्यामुळें, दुखणें जिवावर बेतलें. पुनः शस्त्रक्रिया केली व प्रकृति सुधारली. वैचारिक मतभेदामुळें जगांतील एका बलाढ्य राज्याचा म्हणजे रशियन सोव्हिएटचा पाठिंबा कस्पटासमान मानून रॉय यांनीं अत्यंत असहाय व दैन्यपूर्ण जीवन स्वीकारलें. यामध्ये धीरोदात्ततेची परिसीमा दिसून येते. गेल्या दोन वर्षातील हिंदुस्थानांतील त्यांची कारकीर्द याचीच साक्ष देते. एका दृष्टीनें राजकारणांत ते आज एकटे आहेत. त्यांचे कांहीं मित्र सोडल्यास देशांतील सगळ्या पक्षाच्या पुढायांनीं त्यांस बाजूस फेकण्याचा प्रयत्न चालविला आहे. किंबहुना हा एक प्रकारचा कटच आहे. हिंदुस्थानांत अजून शास्त्रीय दृष्टि व बुद्धिवादी विचारसरणी रूढ व्हावयाची आहे. तोंपर्यंत भाई रॉय यांस असेच दिवस काढावे लागतील. रॉय हे सवंग लोकप्रियतेच्या व मोठेपणाच्या पाठीमागें लागणारे गृहस्थ नाहींत. तशी थोडी जरी वृत्ति त्यांचे ठायीं असती तर काँग्रेसमधील सुधारणावादी किंवा भावनाप्रधान जहाल पुढायांत मानाचें स्थान त्यांस मिळवितां आलें असतें.
हिंदुस्थानांतील गेल्या दोन पिढ्यांतील टिळक, रानडे, गोखले, गांधी, जवाहरलाल इत्यादि पुढायांच्या ठायीं प्रत्येकाचें वैशिष्ट्य म्हणून कांहीं स्वतंत्र गुण दिसतात. टिळक यांचे ठायीं धडाडी, बुद्धिवाद व विद्वत्ता; रानडे यांचे ठायीं दूरदृष्टि व पांडित्य; गोखले यांचे ठिकाणीं वक्तृत्व व सहृदयता; गांधीचें पाशीं महंती, राजकीय चातुर्य व समयज्ञता; जवाहरलाल यांच्या जवळ तडफ, भावनाप्रधान उत्साह व महत्त्वाकांक्षा हे गुण उत्कटतेनें वास करतात. या सर्वांच्यापेक्षां स्वतंत्र असे रॉय यांचे वैशिष्ट्य म्हणजे