पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रस्तावना



 अनुभवशरणतेची सूचक आहे. परिस्थिति बदलली किंवा अनुभव बदलला म्हणजे अगोदर ठरविलेला विचार बदलण्यासही धैर्य लागतें. कारण त्यामुळें चंचलता, संधिसाधुपणा, इत्यादि आरोप सहन करावे लागतात.
 रॉय यांनी हिंदी क्रांतीच्या तत्त्वज्ञानांत दोन मोठ्या गोष्टींची भर घातली. पहिली गोष्ट म्हणजे हिंदी राष्ट्रीय क्रांतीचें तंत्र निश्चित केलें. ज्या हिंदी समाजांत ही क्रांति घडून येणार त्या समाजाचें अर्थशास्त्राच्या व इतिहासशास्त्राच्या आधारें पृथक्करण केलें; क्रांतिकारक वर्ग कोणते व क्रांतिविरोधी वर्ग कोणते याचें विवेचन केलें; राजकीय सत्ता हस्तगत करण्याकरितां साम्राज्यविरोधी युद्ध करणें अपरिहार्य आहे असे ठरविलें; या युद्धाचें साधनभूत असलेल्या क्रांतिकारक लोकपक्षाच्या संघटनेची पद्धति सांगितली; व दुसरी गोष्ट म्हणजे विचारक्रांतीची आवश्यकता आणि तिचे स्वरूप यांचे विवरण केलें. हिंदी समाजांत धार्मिक व आध्यात्मिक विचारसरणी अद्याप अतिशय प्रबळ आहे त्यामुळें हिंदी राष्ट्रीय क्रांतीस विचारक्रांतीची अतिशय आवश्यकता आहे. जुनें तत्त्वज्ञान टाकलें नाहीं तर राष्ट्रीय क्रांति यशस्वी होणेंच असंभवनीय आहे. मार्क्सवाद येण्याच्या अगोदर बुद्धिवाद व विज्ञानदृष्टि आली पाहिजे. श्रद्धेच्या ऐवजी जिज्ञासेस प्राधान्य आले पाहिजे. आज्ञाधारकतेच्या ऐवजी चिकित्सा आली पाहिजे, अध्यात्मवादाचे ऐवजीं भौतिकवाद प्रतिष्ठित व्हावयास पाहिजे. जुन्या इमारतीचे कुजलेले खांब जसे नव्या इमारतीस निरुपयोगी, तितकीच धार्मिक विचारपद्धति कुचकामाची आहे. आजपर्यंत झालेले राष्ट्रीय पुढारी पुराण्या विचारपद्धतीचा अवलंब करून राष्ट्रीय चळवळीची धुरा वाहत आले आहेत. हें हिंदी राष्ट्रीय चळवळींतील मोठे दौर्बल्य आहे. या दौर्बल्याचा नाश झाल्याशिवाय राष्ट्रीय क्रांतीच्या लढ्यास जोर येणार नाही. कोणतीही सामाजिक क्रांति विचारक्रांतीशिवाय होत नसते. हिंदी सामाजिक क्रांतीस विचार-