पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



प्रस्तावना
मानवेंद्रनाथ रॉय यांचे व्यक्तित्व

 श्री. मानवेंद्रनाथ रॉय यांचे अल्पचरित्रही श्री. नखाते यांनीं या पुस्तकास जोडलें आहे. मानवेंद्रनाथ रॉय यांच्या संगतीचा मला गेल्या दोन वर्षात अनेक वेळां लाभ झाला. पण त्यांच्याकडून अनेक वेळां पृच्छा करूनही आत्मचरित्रासंबंधीं विशेष माहिती मिळाली नाहीं. त्यांना आत्मकथनाचा स्वाभाविक वीट आहे असें दिसलें. १९१८ सालीं प्रसिद्ध झालेल्या रौलेट कमिटीच्या राजद्रोह वृत्तांत त्यांचे अल्प वयांतील म्हणजे १८ ते २० वयाच्या सुमारचे अद्भुत क्रांतिकारक प्रयत्न 'जर्मन कारस्थान' या प्रकरणांत वाचावयास मिळतात. त्यांचें एक त्रोटक चरित्रही स्वतंत्र रीत्या प्रसिद्ध झालें आहे. त्यांत त्यांचें परदेशांतील क्रांतिकारक जीवन व विचार कसे होते हें समजतें. लहानपणापासून घेतलेल्या क्रांतीच्या दीक्षेमुळें पूर्ण अकिंचन स्थितींत ते आयुष्य काढीत आहेत. दारिद्रय त्यांच्या अगदी अंगवळणी पडलें आहे. त्यांच्या ग्रंथांवरून विशाल प्रतिभाशाली व व्यासंगी बुद्धिमत्तेचा, प्राच्य व पाश्चात्य विद्यांमधील प्राविण्याचा आणि दीर्घ अनुभवाचा प्रत्यय येतो.
 त्यांना श्रीमंत मित्र लाभलेले नाहींत. समाजवादी पुढारी ज्यांत प्रमुख आहेत अशा पक्षावर आक्षेप घेतल्यामुळें ते मध्यमवर्गीय पुढारी रॉय यांचेपासून फार दूर असतात. तृतीय आंतरराष्ट्रीय क्रांति संस्थेच्या ( Third International ) मित्रांचें व त्यांचे अद्याप जमत नाहीं. राष्ट्रीय सभेमधील सुधारणावादी पुढारी त्यांच्या वायासही उभे राहात नाहीत. त्यामुळें रॉय यांस सगळेच नवीन आहे.
 राष्ट्रीय सभेतील अनेक क्रांतिकारक विचारसरणीचे कार्यकर्ते त्यांच्या विचारांचा अंगीकार करीत आहेत. त्यांच्या विचारपद्धतीचा प्रभाव राष्ट्रीय सभेतील सगळ्या पक्षांवर पडत आहे. उदाहरणार्थ

११