जिव्हारीं बसली. पण मुसलमानी धर्मप्रसाराचें मुख्य कारण तरवार नव्हे. तसें मानलें तर मुसलमानांची राजधानी असलेल्या दिल्लीच्या भोंवतालच्या संयुक्त प्रांतांत मुसलमान अत्यल्प कां आहेत याचा उलगडा होत नाहीं. पंजाब व बंगाल यांतील बहुजन मुसलमान अत्यंत दरिद्री शेतमजूर आहेत. हेच हिंदुसमाजांतील शूद्रातिशूद्र होत. पंजाबांतील व बंगाल्यांतील बहुतेक सुसंस्कृत व सधन वर्ग हिंदूत मोडतात. बंगाल्यांत शेकडा सत्तेचाळीस हिंदू आहेत पण चारपंचमांश धन व भूमि यांचें स्वामित्व हिंदूकडे आहे. कच्छी, बोहरी वगैरे कांहीं जाती सोडल्यास मुसलमान समाज सगळ्याच बाबतींत मागासलेला आहे. पण इस्लाममुळें तो संघटित व प्रतिकारक्षम आहे.
हिंदुस्थानांतील एका मोठ्या समाजाला अत्यंत वंद्य असलेल्या इस्लामचें हें रॉयलिखित ऐतिहासिक महत्त्व हिंदू सुशिक्षितांनीं समजून घेऊन परस्परांचे दुराग्रह नाहींसे करून घेण्याची ही मोठी संधि आहे. यापुढे ज्या राजकीय व सामाजिक उलाढाली होणार आहेत, त्यांतून हिंदू व मुसलमान यांच्या संगमानें नवीन हिंदी समाज व हिंदी राष्ट्र निर्माण होणार आहे. या भावी समाजक्रांतीचें विचारसूत्र सांगण्याचे कार्य या देशांतील हिंदू व मुसलमान विचारवंत करीत आहेत. या विचारवंतांत अत्यंत श्रेष्ठ पदवी असलेले श्री. मानवेंद्रनाथ रॉय यांनी मार्क्सवादी दृष्टीने हे सुंदर पुस्तक इंग्रजीत लिहिलें आहे. या पुस्तकामुळें या दोन्ही समाजांतील अनेक गैरसमजांचे निराकारण होईल. या इंग्रजी पुस्तकाचा मराठीत चांगला अनुवाद इतक्या लवकर होईल, असे मला वाटलें नव्हते. पण माझे स्नेही श्री. नखाते यांनी अकल्पित रीतीनें मला एके दिवशीं हा अनुवाद दाखविला. अनुवादकास मूळचा भावार्थ चांगला प्रकट करतां आला आहे. श्री. मानवेंद्रनाथ रॉय यांचे लेखनांत अर्थगांभीर्य, तार्किक संगति व शास्त्रीय व्यवस्था या गुणांबरोबर प्रसन्नताही आहे. हे गुण अनुवादकानें कायम राखिले आहेत.