अरबांनीं युरोपच्या दीर्घ अज्ञानतमाचा नाश केला. युरोपला कुंभकण निद्रेतून जागे केले. यानंतर युरोपकडे जागतिक संस्कृतीचें पुढारीपण गेलें.
महंमदाचें चरित्र पौर्वात्य व पाश्चात्य विशेषतः सुसंस्कृत हिंदी शिक्षितांस आदर्शभूत वाटणार नाही हे खरें आहे. महंमदाचें वैयक्तिक आचरण त्याच्या मागासलेल्या अर्धरानटी समाजस्थितीच्या पाश्र्वभूमिकेंत पाहावें; म्हणजे त्याबद्दल अनादर कमी वाटेल. पण त्याची उच्च प्रतिभा, उदार हृदय व कठोर निश्चय हे गुण त्याच्या धर्मात प्रतिबिंबित झाले आहेत. इस्लामामुळे समुद्रावरील दर्यावर्दीपणांत वाकबगार अशा, उंट व घोडे यांवरून खुष्कीच्या मार्गानें व्यापार करणा-या अरबी समाजांत शूर सेनापती, सम्राट् व धर्माध्यक्ष निर्माण झाले; त्याचा पाया महंमदानेच घातला.
हिंदुस्थान ज्या मुसलमानांनीं जिंकला ते मुसलमान सुसंस्कृत अरबांपैकीं नव्हते. प्रथमतः मुसलमानी धर्म मुख्यतः दोन मानववंशांत पसरला. एक सेमेटिक मानववंश व दुसरा मंगोलियन मानववंश सेमेटिक लोक उच्च संस्कृतीचे होते तसे मोंगल नव्हते. मोंगल हे मागासलेले, हिरवट व क्रूर होते. परंतु त्यांना देखील हिंदुस्थानांत पुष्कळच मोठ्या गोष्टी करतां आल्या. हिंदुसमाज जीर्ण व दुर्बल अवस्थेस पोंचल्यामुळे मुसलमानांचे येथे फावलें. हिंदुस्थानांत एक पंचमांश मुसलमान धर्मी प्रजा आहे, ती सगळी तरवारीच्या जोरावर वाढली नाहीं. हिंदुसमाजरचनेच्या अंतर्गत दोषामुळेच हिंदुस्थानांत मुसलमानांचा प्रभाव पडला. उच्च संस्कृतीपासून दूर राखलेला हीन, पतित व पापी म्हणून गणलेला शूद्रांचा व अतिशूद्रांचा वर्ग हिंदुसमाजांत फार प्राचीन कालापासून होता. त्यांतील सामाजिक दौर्जन्यामुळें तप्त झालेला बहुसंख्य दलित वर्ग हिंदुसमाजांतील असह्य विषमतेच्या तीव्र विषारी धारेमुळे इस्लामचा आश्रय करून शांत झाला. इस्लामची तरवारीची धार ही कांहीं वेळां हिंदुसमाजाच्या