तिसरा अनुयायी झैद झाला. तो गुलाम ज्याला मुहंमदांनीं एकदम मुक्त केलें होतें. त्यानें हा नवधर्म घेतला. आणि चौथे अनुयायी कोण झाले? अबुबकर. ते मक्केंतील श्रीमान् व्यापारी होते. उदार, शहाणे, धोरणी, शांत, धीराचे, होते. मुहंमदांस 'अल-अमीन' म्हणत, तसें यांना 'अस-सिद्दीक' म्हणजे सच्चा असें म्हणत. मुहंमदांहून दोनच वर्षांनीं ते लहान होते. त्यांना अब्दुल काबा म्हणजे काबाचा सेवक असेंहि म्हणत. अशा वजनदार व थोर पुरुषानें हा नवधर्म एकदम स्वीकारला, या गोष्टीचा मोठा नैतिक परिणाम झाला. त्यांच्या पाठोपाठ आणखी पांच या नवधर्मात आले. अबुबकर पुढें खलिफा झाले. तसेंच पुढे खलिफा होणारे उस्मान हे मिळाले. उस्मान हा प्रतिस्पर्धी उमैय्या घराण्यांतील होता. दुसरा अब्दुर रहमान तिसर साद- ज्यानें पुढें इराण जिंकून घेतला. चौथा खदिजेचा नातलग झुबैर. आणि पांचवा तो शूर लढवय्या तल्हा. उस्माननें नवधर्म स्वीकारला हे ऐकून त्याचे चुलते संतापले.
त्यांनीं उस्मानला बांधलें व विचारलें, "पूर्वजांच्या धर्मापेक्षां तुला का हा नवा धर्म पसंत आहे? जो नवा धर्म तूं घेत आहेस तो जोपर्यंत तूं सोडणार नाहींस, तोपर्यंत मी तुला सोडणार नाहीं." परंतु उस्मान उत्तरला, त्या परमेश्वराचीच शपथ घेऊन मी सांगतों कीं तो नवधर्म मी प्राण गेला तरी सोडणार नाहीं!"
कांहीं अनुयायी कनिष्ठ व सामान्य जनतेतीलहि मिळाले. मक्केतील कांहीं निग्रो गुलाम या नवधर्माचा स्वीकार करते झाले. तो हबशी 'बिलाल' इस्लामी इतिहासांत प्रसिद्ध आहे. इस्लामी धर्माचा पहिला मुअज्जिन म्हणून बिलाल प्रसिद्ध आहे. पैगंबरांचा हा अत्यंत निष्ठावंत शिष्य होता. अभंग श्रद्धेचा धर्मात्मा होता. मुहंमद प्रेमानें म्हणत, "बिलाल म्हणजे अबिसिनियाचें सर्वोत्तम फळ आहे!"
मुहंमदांच्या अत्यंत जवळचे आत मित्र त्यांचे पहिले अनुयायी. मुहंमदांची तळमळ, त्यांची दैवी स्फूर्ति, त्यांची पवित्र शिकवण, त्यांची उत्कटता यांचा हा पुरावा आहे. या जवळच्या सूज्ञ मंडळींस मुहंमदांच्या शिकवणींत वंचना दिसती, अश्रद्धा वा केवळ ऐहिकता दिसती तर मुहंमदांची सामाजिक सुधाणेची व नैतिक पुनरुज्जीवनाची सारी आशा मातीत मिळाली असती. या अनुयायांनी छळ सहन केलें. संकटे सोसली. शारीरिक वेदना व मानसिक दुःखें सहन
इस्लामी संस्कृति । ५९