Jump to content

पान:इस्लामी संस्कृति खंड पहिला मुहंमद पैगंबर चरित्र.pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

म्हटली असेल तर ती खदिजेनें, मुहंमदांच्या दैवी जीवनकार्यावर तिनेंच प्रथम श्रद्धा ठेविली, इतकेंच नव्हे तर पुढील झगड्यांत तिनं त्यांना सदैव धीर दिला. जेव्हां तो कावराबावरा होऊन त्या रात्रीं तिच्याकडे आला व "खदिजे, खदिजे; पांघरूण घाल माझ्यावर, कपड्यांत लपेट मला." असें म्हणाला त्या वेळेस ईश्वराने खदिजेच्या रूपानेंच जणुं त्याला धीर दिला, शांति दिली. तीच त्याला म्हणाली, "ऊठ." तिनेच त्याचा बोजा हलका केला. माझी तुझ्यावर श्रद्धा आहे म्हणाली. लोकांना वाटेल तें बडबडूं दे. लक्ष नको देऊं, असें म्हणाली. परमेश्वरानें ज्ञान दिले, खदिजेनें शांति व विश्वास दिला.
 पहिल्या पहिल्याने ज्यांचें महंमदांवर प्रेम होतें त्यांच्याशींच ते आपला आत्मा प्रकट करीत. आपला नवसंदेश देत. पूर्वजांच्या विकृत व अशुध्द आचारांपासून परावृत्त व्हा म्हणत. अब्राहामचा शुद्ध धर्म मी पुन्हां आणला आहे म्हणत. खदिजेनंतर अली त्यांचे अनुयायी झाले. पैगंबर मक्केच्या सभोवतालच्या एकान्तमय वाळवंटांत जात. तेथे खदिजा व अलि यांच्यासह ते प्रार्थना करीत. तिघांची कृतज्ञतापूर्वक एकत्र प्रार्थना. पहिली सामुदायिक प्रार्थना. एकदां तीं तिघें अशीं प्रार्थना करीत असतां चुलते अबु तालिब यांनीं पाहिलें. ते मुहंमदांस म्हणाले, "बेटा, हा कोणता धर्म तूं आचरीत आहेस?" मुहंमद म्हणाले, "ईश्वराचा. त्याच्या देवदूतांचा. त्याच्या पैगंबरांचा. आपल्या प्राचीन अब्राहामचा हा धर्म. लोकांना सत्यमार्गाकडे आणावें म्हणून परमेश्वरानें मला पाठविलें आहे. आणि काका, तुम्हीहि ईश्वराचे अति थोर सेवक आहांत. तुम्हांला ईश्वराचा सेवक म्हणून मी हांक मारावी हें उचित आहे. तुम्हीहि या सत्याचा स्वीकार करा. या सत्याच्या प्रसारासाठी साहाय्य करा." चुलते म्हणाले, "पूर्वजांचा धर्म मी सोडूं शकत नाहीं. परंतु त्या परमश्रेष्ठ परमेश्वराची शपथ घेऊन मी सांगतों कीं, जोंपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत कोणीहि तुला अपाय करणार नाहीं." नंतर तो वृध्द पुरुष आपल्या मुलाला विचारता झाला, "बेटा, तुझा धर्म कोणता?" अली म्हणाले, "तात, त्या एका ईश्वरावर व त्यांच्या या पैगंबरावर विश्वास ठेवतो. मी पैगंबरांबरोबर जातो." अबु तालिब म्हणाले, "मुहंमद योग्य तेच तुला सांगेल. जा बाळ, त्याच्या बरोबर जा. तो वाइटाकडे तुला कधींहि नेणार नाहीं. त्याच्याशी एकनिष्ठ राहण्याचे तुला स्वातंत्र्य आहे."

५८ ।