Jump to content

पान:इस्लामी संस्कृति खंड पहिला मुहंमद पैगंबर चरित्र.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


या प्रसंगानंतर थोड्या दिवसांनी अब्दुल्ला यसरिबला सासुरवाडीस जात असतां वाटेंत मरण पावला. त्याचे वय फक्त पंचवीस वर्षांचं होतें. आणि त्याच्या दुःखी पत्नीनें पुढें लौकरच एका मुलाला जन्म दिला. तेच आपले पैगंबर मुहंमद, जो पुढे सर्व अनाथांचा मायबाप झाला तो जन्मताच पितृहीन होता! इ. स. ५७० च्या ऑगस्टची २९ वी तारीख. त्या दिवशी हा महापुरुष जन्मला. अबिसिनियन सैन्याच्या नाशानंतरचा तो पन्नासावा दिवस होता.
 अरब चालीप्रमाणे एका बेदुइन दाईनें दूध पाजून मुहंमदांस वाढविलें. पुढें तिनें अमीनाजवळ तें वाढलेलें लेकरू आणून दिले. अमीना मोठ्या प्रेमानें व काळजीनें देवाचा हा ठेवा वाढवू लागली. तिचं हृदय दुःखाने पोळलेले होतें. परंतु मुहंमदाच्या बालमूर्तीकडे पाही व शांत राही. परंतु तीहि लौकरच मरण पावली. मुहंमद लहानपणीच पोरके झाले! मुहंमदाचें वय सहा वर्षांचें. आईबापांच्या प्रेमाची पाखर जगांत कुठे मिळणार? तसें वात्सल्य कोण देणार? मुहंमदांच्या मनावर या गोष्टीचा फार परिणाम झाला. पोरक्या मुलांना फसवूं नका, त्यांना प्रेम द्या, असे कुराणांत अनेक उल्लेख आहेत. पोरक्या मुलांची कशी दीनवाणी स्थिति होत असेल, याचा त्यांना अनुभव आलेला होता. ती आठवण ते कधीं विसरले नाहींत.
 आजोबांनीं, अब्दुलमुत्तलिब यांनी मुहंमदांस आपल्याजवळ घेतलें. या नातवावर ते फार प्रेम करीत. देवाला बळी देऊ केलेल्या मुलाचा हा मुलगा.

इस्लामी संस्कृति । ४५