Jump to content

पान:इस्लामी संस्कृति खंड पहिला मुहंमद पैगंबर चरित्र.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वाल्यांप्रमाणं हाशिम व्यापारहि करूं लागला. हिंवाळ्यांत यमनला व उन्हाळ्यांत सीरियामध्यें नियमितपणें मक्केहून कारवान पाठविण्याची त्यानेंच पद्धत सुरू केली. सीरियांतील एका प्रवासांत हाशीम मरण पावला. इ. स. ५१० मध्ये ही गोष्ट झाली. त्याला एक मुलगा होता. त्याचें नाव शयबा परंतु हाशीमचें काम त्याचा धाकटा भाऊ मुत्तलिब याच्याकडे आले. मुत्तलिबला फार मान मिळे. त्याला अल-फैज म्हणजे उदार अशी पदवी होती. शयबा आईसह यसरिब येथे आजोळी होता. शयबाची आई सल्मा ही यसरिबची. यसरि म्हणजे मदिना. मुत्तलिब शयबाला नीट वागवी. लोक म्हणत शयबा म्हणजे मुत्तलिबचा जणुं गुलाम आहे. त्याला ते अब्दुल मुत्तलिब म्हणजे मुत्तलिबचा गुलाम असें म्हणत! पैगंबरांचे आजोबा अब्दुला मुत्तलिब या नांवानें इतिहासांत ओळखले जातात. मुत्तलिब इ. स. ५२० मध्ये मेला. आणि पैगंबरांचे आजोबा अब्दुल मुत्तलिब हे मक्केच्या सार्वजनिक जीवनाचे सूत्रधार बनले.
 या वेळेस मक्केचे काम दहा जणांत वांटून दिले होतें. दहा खातीं दहा जणांकडे. अशी परंपरा पडली होती की या दहांत जो सर्वांत वयोवृद्ध असेल त्याला सर्वांनीं अधिक मान द्यायचा. तो पुढारी. त्याला रईस किंवा सय्यद म्हणत. मुहंमदांचे चुलते अब्बास हे या दहांतील प्रमुख होते. चारित्र्य व दानत यामुळे अब्दुल मुत्तलिब यांचंच प्रभुत्व होते.
 अब्दुल मुत्तलिब यांना संतति होत नव्हती. "मला संतति होऊ दे. एक मुलगा तुला देईन." असा त्यांनी काबाला नवस केला. आणि पुढें पुष्कळ संतति झाली. बारा मुलगे व सहा मुली. नवस फेडण्यासाठी आवडता मुलगा अब्दुल याचा बळि तो देणार होता. परंतु देवानें आवाज दिला शंभर उंट दे, म्हणजे पुरे! अब्दुल मुत्तलिबनें तसें केलें. तेव्हांपासून शंभर उंट म्हणजे खुनाची नुकसान भरपाई असें ठरलें!
 देवाला नैवेद्य म्हणून अर्पण केलेला जो हा अब्दुल्ला तोच पैगंबरांचा पिता. त्याचं अमीनाजवळ लग्न झालें. अमीनाहि यसरिबची होती. याच सुमारास म्हणजे इ. स. ५७० या वर्षी एक महत्त्वाची गोष्ट झाली. यमनच्या अबिसिनियन अधिकाऱ्यानें सना येथे एक चर्च बांधले. काबामुळे मक्केला असलेले पावित्र्य व वैभव नष्ट करावें असें त्याच्या मनांत होतें. कोणी मक्कावाल्यानें हें चर्च

इस्लामी संस्कृति । ४३