बिशप होते. चर्च होते. अरबांना जो ख्रिश्चन धर्म माहीत झाला तो हृदयाचा नव्हता, तर डोक्याचा होता! आणि हा डोक्याचा धर्म अरबांच्या डोक्यांत उतरेना. ख्रिश्चन धर्मात ख्रिस्ताच्या भौतिक व आध्यात्मिक मूर्त व अमूर्त स्वरूपांचे वाद त्या वेळेस चालले होते. अरबांना तें सारें गूढ वाटे.
सर्वसामान्य अरब हा विशेषसा धार्मिक नव्हताच. तो किस्मतवादी होता, दैववादी होता! 'किस्मत्' असें गर्जे व तो लढाईत घुसे. नशिबाच्या हातांतील आपलीं जीवन! आहे काय नि नाहीं काय! कशाला करा फिकीर! वाटेल ते होवो! अशी बेछूट व साहसी वृत्ति त्याची होती. तो संशयवादी, अज्ञेयवादी, ऐहिकदृष्टि, भौतिक वृत्ति होता. कोणी देवदेवतांची परीक्षा घेत. नवस करीत. इच्छेप्रमाणें न झालें तर देवाला नष्टहि करीत! पुष्कळांचा परलोकावर विश्वास नव्हता. मेल्यावर पापपुण्याचा निवाडा होणार आहे, असे फारसे कोणी मानीत नसे. कोणी कोणी थडग्यांना उंट बांधून ठेवीत. उंटावर बसून प्रभूच्या न्यायमंदिराकडे प्रेतात्म्यास जातां यावें म्हणून! परंतु असें करणारे- मेल्यावर जन्म मानणारे- अपवादात्मकच होते.
अरब हा कोणत्याच धर्माची फिकीर नव्हता करीत. जे कांहीं अधिक उन्नत व प्रगल्भ विचारांचे होते त्यांना ख्रिश्चनांच्या चर्चा त्याज्य वाटत. ज्यूंचा अहंकार तिरस्करणीय वाटे. परंतु त्यांना या दगडाधोंड्यांची, झाडामाडांची पूजाहि आवडत नसे. हा सारा मूर्खपणा आहे असे त्यांना वाटे. या समुद्रकांठच्या अरबांतच अनेक देवदेवतांविरुद्ध अप्रीति उत्पन्न झाली. हा धर्म त्यांना रुचेना, पटेना. ज्यू, ख्रिश्चन यांच्या एकेश्वरी विचाराने अरबांतहि वैचारिक जागृति उत्पन्न झाली होती, बुद्धींत खळबळ, हालचाल सुरू झाली होती. सुशिक्षित अरबांत चर्चा होत. वाद होत. कुरबुरी, कुरकुरी होऊं लागल्या. एकेश्वरी कल्पनांची बोलणी सुरू झाली. अस्तित्वांत असलेल्या श्रद्धेविषयीं कांहींना असमाधान वाटूं लागलें. या लोकांना हनीफ म्हणजे अज्ञेयवादी म्हणत. हिब्रू शब्द हनेफ असा आहे. त्याचा अर्थ नास्तिक. या हनीफांनीं मुहंमदांसाठीं मार्ग तयार करून ठेवला होता. भूमि नांगरली होती. प्रबळ इच्छाशक्तीची महान् विभूति पाहिजे होती. एक प्रकारची धार्मिक अस्वस्थता होती. हनीफांची नकारात्मक भूमिका होती. एक परमेश्वर सर्व सत्ताधीश
३६ ।
पान:इस्लामी संस्कृति खंड पहिला मुहंमद पैगंबर चरित्र.pdf/५०
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
