Jump to content

पान:इस्लामी संस्कृति खंड पहिला मुहंमद पैगंबर चरित्र.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ही अरब संस्कृति सर्व ठिकाणच्या संबंधांपासून जन्मली म्हणून ती लौकर वाढली. प्रगति सत्वर झाली. लोक नीट घरें दारे करून राहूं लागले. हवा फार कडक व इतरहि अडचणी त्यामुळे घरे बंद असत. शिल्पशास्त्रांत फार प्रगति म्हणून झाली नाहीं. घरांत अंधार असे. तेथील नक्षी, कला कोण पाहणार? घरें विटांचीं असत. घरे आंत ओलसर व दमट ठेवीत. तशी जरूर असे. अधिक दमटपणा व कमी प्रकाश हें तत्त्व असे. संगीताची बरीच प्रगति झाली होती. शेती व व्यापाराने संपत्ति वाढली होती. नाना देशांतील लोक येत व नैतिक मूल्यमापनांतहि फरक होई. संगीत म्हणजे धन्यतम कला म्हणून नसे आदरिली जात. स्वच्छंदी व विलासी जीवनाचे साधन या नात्यानें संगीताकडे बघत. संगीत म्हणजे विकारांना उत्तेजन. संगीत म्हणजे चिंता काळजी दूर फेंकून सार्वजनिक रीत्या नाचतमाशांत दंग होणें. नाना वाद्ये व नाच अस्तित्वांत आले. जीवन संयमी व्हावयास धर्म नव्हता, नीतिशिक्षण नव्हते. आजच्या पॅरिस, व्हिएन्ना वगैरे शहरांतून, न्यूयॉर्क, शांघाय वगैरे शहरांतून जे जे सुखविलास आढळतात ते सारे मक्केत होते!
 मुहंमदापूर्वी अरब मोठे व्यापारी होते. यमनमधला माल अरबच सीरियांत नेते मुहंमदापूर्वी एक हजार वर्षे होऊन गेलेला एक ज्यू कवि अरब व्यापाराविषयी लिहितो:
 "हे सीरिया, अरब व्यापारी तुझे आहेत. ते मसाले, सोने, मौल्यवान् वस्तु तुला आणून देतात. कोकरें, मेंढ्या, शेळ्या नेतात. निळे कापड नेतात. नक्षीदार कापड नेतात."
 या व्यापारी जीववनाचे केन्द्र मक्का होतें. मक्केला सीरियांतून रेशमी व लोकरीचे कापड, गुलाबी कापड घेऊन व्यापारी येत. आणि वेलदोडे, चंदन लवंगा, सुगंधी वस्तु, खजूर, कांतडीं, धातु वगैरे माल जो आफ्रिकेंतून व हिंदुस्थानांतून येथे येई तो सीरियाकडे घेऊन जात. मक्केतील काबाजवळ मोठमोठ्या व्यापाऱ्यांच्या बैठका ज्यांत भरत असे दिवाणखाने होते. तेथे कवि प्रेमाचीं व शौर्याचीं गाणीं गात. ग्रीक व इराणी गुलामकन्या त्या व्यापाऱ्यांच्या मेजवान्यांतून आपल्या देशांतील संगीतानं रंग भरीत. अद्याप अभिजात अरब संगीत जन्मलें नव्हतें. उंटांना हांकलण्याचीं गाणीं हीच अद्याप अरबांचीं राष्ट्रीय गाणीं
३२ ।