Jump to content

पान:इस्लामी संस्कृति खंड पहिला मुहंमद पैगंबर चरित्र.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अरबस्थानावर इराण व हिंदुस्थानचा होई. पश्चिम भागावर ईजित, नाईल, युरोप, हिंदुस्थान यांचा होई. अरबस्थानाला अशी ही सुंदर संधि होती. सहाव्या- सातव्या शतकांतील अत्यन्त सुधारलेल्या देशांशी संबंध येण्याचे भाग्य त्यांना लाभले होते. हिंदुस्थान, युरोप व आफ्रिका या तिन्ही खंडांशीं अरबांचा संबंध येई व त्यामुळे न वाढणारी प्रगति वाढली. अरबांस व्यापाराची हौस होती. कारण विषम हवेमुळे शेती कठीण. कधी कडक हिंवाळा, कधीं कडक उन्हाळा. कधीं वर्षानुवर्ष अवर्षण पडे. तरीहि अरब शेती करीत. मेसापोटेमियांतील बागबगीचे, मळे त्यांनी पाहिले होते. शेतींत किफायतही चांगली होई. भटक्या बेदुइनी संस्कृतीपेक्षां ही कृषिप्रधान संस्कृति निराळी असणार. कृषिप्रधान प्रदेशांत स्थिर स्वरूपाच्या संस्था उदयास येतात. समुद्रकिनाऱ्यालगतच्या प्रदेशांत नबाबशाही अस्तित्वांत आली. तेथील अरब व्यापारी बनले. हिंदुस्थान चीनपर्यंत जात. संपत्ति जमूं लागली. राजेशाहीच्या कल्पना सर्व देशांतून येथे येत. रोमन व इराणी साम्राज्यांतून कल्पना येत. परंतु मध्य अरबस्थानांतील बेदुइनांच्या लोकशाहीच्या, स्वातंत्र्याच्या कल्पनाहि येत व स्फूर्ति देत. या दोन्ही विचारांचा विरोध असे. यामुळे राजेशाही कल्पनांचे घोडे फार पुढे सरकलें नाहीं. समुद्रकाठच्या अरबांची वृत्ति जरा नबाबी होती. सुखप्रिय व सत्ताप्रिय होती. तेथे सरदारांची, खानदानांची सत्ता होती म्हणा ना. नाहीं धड एक राजा, नाहीं धड लोकशाही. वरिष्ठ वर्गाची, श्रीमंतांची सत्ता होती. गरीब बेदुइनांत लोकसत्ता होती. गरीब अरब शेती व व्यापार हे सान्मान्य धंदे मानीत नसत, लढणें व लुटणे यांना ते सन्मान्य मानीत. कारण यानें स्वातंत्र्य राहते. समुद्रकाठचे अरबहि लढाऊ वृत्तीचे होते. कारण अन्तर्गत अरबांपासून रक्षण करणे, तसेंच मेसापोटेमिया, पॅलेस्टाईन, रोमन साम्राज्य या सर्वांपासून रक्षण करणें जरूर असे. व्यापार व शेती करून जी धन- दौलत ते मिळवीत ती वाळवंटी अरबांनी लुटू नये म्हणून त्यांना शस्त्रास्त्रे ठेवावी लागत. वैयक्तिक व राजकीय दोन्ही कारणांमुळे त्यांची लढाऊ वृत्ति कायम राहिली. वाळवंटी अरब व समुद्रकांठीं अरब दोघेहि झुंजार होते. फरक इतकाच की, समुद्रकांठीं अधिक संस्कृति होती. अनेक देशांशी संबंध येई. त्यामुळे नाना विचार येत. कल्पना येत. ज्ञान येई. परंतु अद्याप ज्ञानासाठी म्हणून ज्ञानाची भक्ति नव्हती. शिकण्यासाठी म्हणून शिकणे सन्मानिले जात नसे. लढणें हें सर्वांच्या आधी. मग व्यापार, मग शेती. सर्वांत शेवटचे स्थान शिकण्याला!

इस्लामी संस्कृति । ३१