Jump to content

पान:इस्लामी संस्कृति खंड पहिला मुहंमद पैगंबर चरित्र.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आहे. सहजसुंदर, अकृत्रिम, मोकळे वर्णन! वाळवंटांतील देखावे, रात्रीच्या वेळी पहाडांतून, दऱ्याखोऱ्यांतून जावयाचे रोमांचकारी प्रसंग, जेथें भुतप्रेत पिशाच्चे राहतात तेथून जाणें, ओसाड वाळवंटांतील नीरव शांति, निःस्तब्ध भव्य भीषणता; आणि वखवखलेले लांडगे भेटणें; भर दुपारी वाळवंटांत येणारी ग्लानि; वाळूचें वादळ उठून गुदमरून जाण्याचे प्रसंग; मृगजळाचं सुंदर, पण फसवे देखावे; ताडाच्या झाडांची छाया; थंडगार शीतल विहिरीजवळचा आनंद; हें सारें अरब काव्यांत आहे. सृष्टिवर्णन आहे, तद्वत् लोकांचे जीवनहि आहे. धनगरांची शांत, स्वस्थ जीवनें, वीरांची रोमहर्षक कृत्यें, युद्धे, लुटालुटी, पाठलाग, सूड, मैत्री, प्रेम, प्रतिस्पर्धी जातिजमातींवरची विडंबनात्मक काव्यं स्वजातीयांची महिम्नस्तोत्रं, मृतांविषयींचीं शोकगीतें, असें हें प्राचीन अरब काव्य आहे. वस्तुस्थिति निदर्शक, अकृत्रिम आहे. बालसदृश वृत्तीच्या लोकांचे हे काव्य आहे. ज्यांच्या डोक्यांत जीवनाचीं गूढें अद्याप शिरलीं नाहींत अशा अकपट अल्लड वृत्तीच्या लोकांचें हें काव्य आहे. त्यांच्या भाषेत वर्तमान काळ आहे, भूतकाळ आहे, भविष्यकाळ नाहीं! अरब भूत व वर्तमान काळांत जगे, रमे. भविष्याची दखलगिरी त्याला नसे. या आत्तांच्या क्षणाला तो उत्कटतेनें पकडतो, पूर्णतया पकडतो. त्या क्षणाच्या पलीकडे पाहण्याचें त्याला भान नसे. उद्यां नशिबी काय असेल, याची त्याला काळजी नसे. भविष्याच्या चिंता वा सुंदर स्वप्नें तो मनांत खेळवीत बसत नाहीं. तो भूतकाळाकडे बघतो. वर्तमान काळांतील मौज भोगतो. संवेदना, भावना, कल्पना यांत तो श्रीमंत होता, चिंतन व विचार यांत गरीब होता. जीवनाचा फेसाळ पेला तो भरकन् पिई व रिता करी. त्याच्या भावना खोल व उत्कट असत. परंतु भूतकाळाकडे पाहून अज्ञात भविष्याकडे नजर फेकणाऱ्या विचारप्रधान युगाची त्याला अद्याप तादृश कल्पना नव्हती. हें अरब काव्य जीवना-पलीकडे उड्डाण करीत नाहीं. अर्थगंभीर नाहीं. परंतु तें तेजस्वी, जोरदार आहे. तें सजीव आहे, उदात्त आहे. खरें व उत्कट आहे. स्वच्छंद व भरपूर आहे.
 अकडा येथें सर्वांत मोठी यात्रा भरे. पवित्र मोहरम महिन्यांत ही यात्रा भरते. या वेळेस देवाचा तह असे. त्या महिन्यांत रक्तपात करायचा नाहीं, सूड घ्यायचा नाहीं. त्या महिन्यांत भांडणे विसरायचीं. सर्वांनीं त्या यात्रेत जमायचें

इस्लामी संस्कृति । २१